शाळांना पोलिसांचे सरप्राइज

शाळांना पोलिसांचे सरप्राइज

पुणे - एरवी पोलिसांना बघून घाबरणारे विद्यार्थी गुरुवारी मात्र पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी मनमोकळेपणाने गप्पा मारत होते. त्यांच्या सेवेतील छान-छान अनुभवही ऐकत होते. त्यांच्या प्रश्‍नांना पोलिस कर्मचाऱ्यांबरोबरच आयुक्तही तितक्‍याच दिलखुलासपणे उत्तरे देत होते. इतकेच नव्हे, तर पोलिसांनी शहरातील शाळांमधील शिक्षकांना १२०० शुभेच्छापत्रे दिली. निमित्त होते शिक्षक दिनानिमित्त पोलिस-विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रमाचे! 

पुणे पोलिसांनी गुरुवारी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध शाळांमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांना ‘सरप्राइज’ दिले. पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी भवानी पेठेतील रफी अहमद किडवाई उर्दू माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, सावित्रीबाई फुले प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी आवर्जून भेट दिली. शाळेतील सर्व शिक्षकांना शुभेच्छापत्र व गुलाबपुष्प देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, महापालिकेचे शिक्षणाधिकारी दीपक माळी, पोलिस निरीक्षक क्रांती पवार, भरत जाधव, मुख्याध्यापिका यास्मीन खान, सचिन मर्कट, डी. आर. उंडे, शिक्षक जमादार आदी उपस्थित होते.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षक दिनाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व सांगतानाच शालेय विद्यार्थ्यांमधील वाढता मोबाईल वापर व गैरवापराबाबत विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले.

अपर पोलिस आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी लष्कर परिसरातील कॅंटोन्मेंट बोर्डाच्या शाळांना भेटी दिल्या. तेथील विद्यार्थी व शिक्षकांशी त्यांनी संवाद साधला. तसेच, शिक्षकांना शुभेच्छापत्र व गुलाबुपष्प देऊन त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अपर पोलिस आयुक्त सुनील फुलारी यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासह अनेक नामवंतांना भेटी देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

शिक्षक आपल्याला घडवितो, संस्कारक्षम बनवितो. शिक्षक दिनानिमित्त त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येते. त्यामुळेच आम्ही शाळांमध्ये जाऊन शिक्षकांना भेटलो. त्यांना शुभेच्छा दिल्या. गुन्हेगारीकडे वळणारे बहुतांश जण अशिक्षित असतात. त्यामुळे शिक्षणाला महत्त्व दिल्यास गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल.
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com