पुडीपंटरांना पोलिसांचा न्यायालयामध्ये हिसका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

 तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जिल्हा न्यायालयात आलेल्यांवर पोलिसांनी कारवाई केली. दिवसभरात सुमारे आठशे जणांची तपासणी करून त्यातील तीनशे ते चारशे जणांकडून तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. पुन्हा हे पदार्थ घेऊन न येण्याची सक्त ताकीद देऊन त्यांना सोडून देण्यात आले.

पुणे - तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जिल्हा न्यायालयात आलेल्यांवर पोलिसांनी कारवाई केली. दिवसभरात सुमारे आठशे जणांची तपासणी करून त्यातील तीनशे ते चारशे जणांकडून तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. पुन्हा हे पदार्थ घेऊन न येण्याची सक्त ताकीद देऊन त्यांना सोडून देण्यात आले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कविदास जांभळे, सहायक पोलिस फौजदार कमलाकर गायकवाड, गुंगा जगताप, पोलिस हवालदार सुनील शिंदे, पोलिस नाईक किशोर आव्हाड, पोलिस शिपाई मुरलीधर डांगे, स्नेहल टकले, पोलिस नाईक आशिष पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. न्यायालयाच्या नव्या आणि जुन्या इमारतीमधील भिंती तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकून लाल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवांसापूर्वी न्यायालयातील परिसर स्वच्छ राहावा, यासाठी येथील काही वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना निवेदन देऊन न्यायालयात थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याचधर्तीवर प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांनी परिपत्रक काढून न्यायालयाच्या आवारात थुंकणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या आवारात थुंकल्यास दोन हजार रुपये दंड किंवा तीन महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. न्यायाधीशांनी काढलेल्या परिपत्रकाच्या आधारे पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Tobacco products seized in court