भारतीय चलनाच्या कायद्याबाबत पोलिसच अनभिज्ञ 

रवींद्र जगधने
सोमवार, 2 एप्रिल 2018

पिंपरी (पुणे) : भारतीय चलन न स्वीकारणे म्हणजे देशाचा अपमान असून याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. अशा भारतीय रिजर्व्ह बॅंकेच्या सूचना असताना पोलिसांना मात्र, याबाबतच्या कायद्याची माहितीच नसल्याने दहा रुपयाचे नाणे न स्विकारल्याबद्दल तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागरिकाला घरी पाठवले आहे. 

पिंपरी (पुणे) : भारतीय चलन न स्वीकारणे म्हणजे देशाचा अपमान असून याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. अशा भारतीय रिजर्व्ह बॅंकेच्या सूचना असताना पोलिसांना मात्र, याबाबतच्या कायद्याची माहितीच नसल्याने दहा रुपयाचे नाणे न स्विकारल्याबद्दल तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागरिकाला घरी पाठवले आहे. 

दहा रुपयाचे नाणे बंद झालेल्या अफवेने देशातील अनेक भागात दहाचे नाणे अनेकांनी स्वीकारणे बंद केले. मात्र, आरबीआयने खुलासा करून दहाचे नाणे बंद झाले नसून देशाचे कोणतेही वैध चलन नाकारणे हा देशद्रोहाचा गुन्हा असल्याचे सांगितले. याबाबत देशातील विविध वृत्तपत्रात बातम्या झळकल्या होत्या. परंतु दहाचे नाणे नाकारण्याचे प्रकार आजही सुरू आहेत. 

पिंपरीतील गांधीनगर परिसरात लाखन रावळकर यांच्याकडून चार किराणा दुकानदारांनी दहा रुपयांची नाणे स्वीकारली नाहीत. त्यामुळे रावळकर पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेले असता, एका पोलिस कर्मचाऱ्यांनी रावळकर यांनाच शिवीगाळ करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची दमबाजी केली. त्यानंतर रावळकर पिंपरी पोलिस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेले. मात्र, "अशा प्रकारचा कोणताही कायदा आम्हाला माहीत नसून याबाबत आरबीआयकडे तक्रार करा.'' असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे एका बाजूला आरबीआय सांगते दहाचे नाणे नाकारल्यास देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल होऊ करतो, तर दुसऱ्या बाजूला पोलिसांना असा कोणता कायदा आहे का, याबाबत माहितीच नाही. त्यामुळे रावळकर यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. 

राज्य शासनाकडे तक्रार दाखल 
रावळकर यांनी दहाचे नाणे न स्विकारणे व तक्रार देण्यास गेल्यावर त्यांनाच शिवीगाळ केल्याप्रकरणी राज्य शासनाच्या आपले सरकार या अॅपवर तक्रार दाखल केली आहे. तसेच राज्य शासनाकडून दखल घेण्याची आशा असल्याचे ते म्हणाले. 

संबंधित तक्रारदाराने मला येऊन भेटल्यास कायदेशीर बाबींची तपासणी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले. 

Web Title: Police is unaware of the Indian currency law