पुणे : पोलिसांनी वाचला वृद्धाश्रमाचा बोर्ड अन्...

निलेश बोरुडे
शनिवार, 11 जानेवारी 2020

- बोर्ड वाचून पोलिस अधिकाऱ्यांची पावले वळली वृद्धाश्रमाकडे

- वृद्ध अंध महिलांना वाढले जेवण

किरकटवाडी : हवेली पोलिस ठाण्याच्या माध्यमातून आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन होते. जमलेले नागरिक व वाहन चालक आपापल्या मार्गाने निघत असतात. कार्यक्रमाचे आयोजक असलेले हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारीही निघण्याच्या तयारीत असतात; तेवढ्यात अभियानाचे उद्घाटन करण्यासाठी आलेले हवेली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन नम यांची नजर रस्त्याच्या कडेला लावलेल्या वृद्धाश्रमाच्या फलकाकडे जाते. येथे वृद्धाश्रम आहे का? असे उपस्थितांना विचारून पोलिस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते व पोलिस कॉन्स्टेबल रूपाली धिवार यांनासोबत घेऊन नितीन नम हे थेट वृद्धाश्रमात जातात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिस उपनिरीक्षक नितीन नम हे वडगाव मावळ येथून बदली होऊन हवेली पोलिस ठाण्यात मागील महिन्यात रुजू झाले आहेत. नवीन असल्याने या भागाविषयी त्यांना जास्त माहिती नाही. मात्र, एक महिन्याच्या कालावधीतच त्यांनी शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. आज अचानक त्यांनी वृद्धाश्रमाला भेट दिल्याने त्यांच्यातील संवेदनशीलताही दिसून आली आहे.

Image may contain: 2 people, people smiling, people sitting, people eating and food

सिंहगड रोडवरील नांदेड फाट्याजवळील दळवीवाडी येथे पुणे अंध जन मंडळ या संस्थेचा अंध महिलांसाठी 'शिर्डी साईबाबा अंध महिला वृद्धाश्रम'या नावाने वृद्धाश्रम आहे. 55 ते 80 या वयोगटातील 44 अंध वृद्ध महिला सध्या या आश्रमात आश्रयाला आहेत. या आश्रमातील सर्व सेवा मोफत आहेत.

आश्रमातील कर्मचारी चकीत

सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन नम हे इतर पोलिस अधिकाऱ्यांसह अचानक वृद्धाश्रमात आल्याने प्रथमतः आश्रमाचे कर्मचारी चकित झाले. अचानक आश्रमात पोलिस आल्याने आपल्याकडून काही चुकले तर नाही ना! असे भाव आश्रमातील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागले.

वृद्धाश्रमाचा बोर्ड दिसला म्हणून आलो

आश्रमाच्या व्यवस्थापिका सोनल पात्रे यांनी पोलिस अधिकाऱ्यांचे स्वागत केले.'रस्त्यावर बोर्ड दिसला म्हणून भेट देण्यासाठी आलो, कुठलीही चौकशी करण्यासाठी आलेलो नाही किंवा आश्रमात प्रवेश घेण्यासाठीही आलो नाही', असे नितीन नम यांनी व्यवस्थापिका सोनल पात्रे यांना सांगताच उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसले.

आश्रमातील पाहणी

सोनल पात्रे यांनी अंध महिलांसाठी आश्रमातच असलेली दवाखान्याची सोय, व्यायाम खोली, सभागृह, झोपण्याची व्यवस्था, स्वयंपाक गृह अशी आश्रमातील सर्व व्यवस्था नितीन नम व सोबत असलेल्या महिला पोलिस अधिकार्‍यांना फिरुन दाखवली.

अंध महिलांचे होते जेवण सुरु

नेमकेच जेवणाच्या हॉलमध्ये अंध महिलांचे जेवण सुरू होते. नितीन नम यांनी स्वतः वृद्ध अंध महिलांना भाजी वाढली. त्यांच्याशी संवाद साधला. जेवणाच्या पंक्तीमध्ये फिरून नितीन नम 'भाजी घ्या,पोटभर जेवा' असा आग्रह करत होते.

पोलिसांकडून व्यवस्थापनाचे कौतुक

आश्रमातील व्यवस्था अत्यंत चांगली असल्याबाबत व्यवस्थापनाचे कौतुकही नितीन नम यांनी केले. काही अडचण आल्यास आमच्या हवेली पोलिस ठाण्याशी संपर्क करा. आम्ही तात्काळ तुमच्या मदतीसाठी येऊ असा विश्वासही नितीन नम यांनी व्यवस्थापिका पात्रे यांना दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Visited Old Age Home in Pune