शहरातील बाराशे गुन्हेगारांवर ‘नजर’

Police
Police

पिंपरी - लोकसभा निवडणुका सुरळीतपणे पार पडाव्यात, यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक हाणामारीचे गुन्हे दाखल असणाऱ्या बाराशे गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची पथके सक्रिय झाली आहेत.

पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाच्या हद्दीत पुणे जिल्ह्यातील बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ या चारही मतदारसंघांचा भाग येतो. यापैकी दिघीतील काही परिसर पुणे मतदारसंघात येतो, तर हिंजवडीचा परिसर बारामती भागात येतो. मावळ आणि शिरूरचा मोठा भाग आयुक्‍तालयाच्या हद्दीत येतो. या चार मतदारसंघांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार असल्याने पोलिस यंत्रणेवर ताण येणार आहे. आयुक्‍तालयाच्या स्थापनेनंतर प्रथमच होणाऱ्या परिमंडळ एकमध्ये ८७३, तर परिमंडळ दोनमध्ये ८६३ गुन्हेगार पोलिसांच्या यादीत आले आहेत. निवडणुकीच्या वेळी गुन्हे दाखल झालेल्यांची वेगळी यादी तयार केली आहे. या गुन्हेगारांचा वापर निवडणुकीत होऊ नये म्हणून पोलिसांनी आत्तापासूनच उपाययोजना सुरू केली आहे. रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत असून, त्यात संशयित गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. दोनपेक्षा अधिक हाणामारीचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. या पुढील काळात कोम्बिंग ऑपरेशन आणखी प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपींवरील गुन्ह्यांच्या तीव्रतेनुसार कोम्बिंग ऑपरेशन किंवा नाकाबंदीत पकडलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईत गुन्हेगारांकडून निवडणूक काळामध्ये चांगल्या वागणुकीसाठी प्रतिज्ञापत्र घेतले जाणार आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईतांवर तडीपारीची कारवाई केली जाणार आहे. परिसरात दहशत पसरविणाऱ्या ‘हिस्ट्रीशिटर’वर मोक्का किंवा ‘एमपीडीए’ची कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले.

आगामी निवडणुका आणि प्रचाराच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.
- सतीश पाटील, सहायक आयुक्‍त, गुन्हे शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com