आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

दिव्यांग उमेदवारांनी पुणे स्टेशन येथील टपाल कार्यालयासमोर चार दिवसांपासून उपोषण सुरू ठेवले आहे. परंतु, प्रशासनाने त्याची अद्याप दखल घेतली नसून पोलिसांमार्फत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप या उमेदवारांनी केला आहे.

पुणे - भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र विभागाच्या भरतीप्रक्रियेद्वारे नियुक्त झालेल्या दिव्यांग उमेदवारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले. औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार, पुन्हा कामावर घ्यावे, या मागणीसाठी या दिव्यांग उमेदवारांनी पुणे स्टेशन येथील टपाल कार्यालयासमोर चार दिवसांपासून उपोषण सुरू ठेवले आहे. परंतु, प्रशासनाने त्याची अद्याप दखल घेतली नसून पोलिसांमार्फत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप या उमेदवारांनी केला आहे. दरम्यान, गुरूवारी एका दिव्यांग उमेदवाराची प्रकृती खालावल्याने उपोषणकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. 

भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र विभागामध्ये २०१६ मध्ये २४३४ पदांसाठी स्पर्धा परीक्षेअंतर्गत भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये ७७ दिव्यांग उमेदवारांची निवड करण्यात आली. कागदपत्रांची पडताळणी, वैद्यकीय चाचणीनंतर त्यांची राज्यातील विविध शहरांमधील टपाल कार्यालयांमध्ये नियुक्ती करण्यात आली. मात्र, सहा महिन्यांनंतर कामावर रुजू झालेल्या दिव्यांगांसह ३५६ कर्मचाऱ्यांना टपाल विभागाच्या राज्य  विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बडतर्फ करण्यात आले. तर, २०७८ उमेदवारांना पुन्हा पुन्हा परीक्षा देण्याचे आदेश काढण्यात आले. 

याप्रकरणी दिव्यांग व इतर उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने संबंधित भरतीप्रक्रियेतील गैरप्रकार करणाऱ्यांना बाजूला ठेवून उर्वरित उमेदवारांना आठ महिन्यांच्या आत कामावर रुजू करून घेण्याचे आदेश दिले. परंतु टपाल खात्याने अद्यापही न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. टपाल खात्याकडून सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध देवानंद राशेराव, सुभाष शिंदे, संदीप मिळे व राजू शिंदे या चार दिव्यांगांसह अन्य तरुणांनी पुणे स्टेशन येथील वरिष्ठ टपाल अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून संबंधित आंदोलन बेकायदेशीर असल्याचे सांगून मंडप उतरविण्याच्या सूचना दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. दरम्यान, राशेरावची गुरूवारी प्रकृती खालावली. त्याने वैद्यकीय तपासणीस नकार दिला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police were trying to suppress the agitation