पोलिओ मोहीम प्रभावीपणे राबविणार - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यातील अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली.

पुणे - पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यातील अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरुवात पवार यांच्या हस्ते करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात पाच वर्षांखालील बालकांना पोलिओचा डोस देऊन मोहिमेस सुरुवात करण्यात आली. पवार म्हणाले, ‘‘देशातून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याची जबाबदारी सामूहिक असून, निरोगी पिढी घडवण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. पोलिओचा एकही रुग्ण राहणार नाही, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. भविष्यातही पोलिओचा रुग्ण आढळू नये, म्हणून लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे.’’

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, ‘पुणे जिल्ह्यात १९९९ पासून पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही. माहिती, शिक्षण व संवाद या माध्यमातून हे अभियान यशस्वी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ११ लाख ११ हजार ३३४ बालके या लसीकरणासाठी अपेक्षित लाभार्थी असून, सहा हजारांहून अधिक बूथद्वारे लसीकरण करण्यात येत आहे.’’  

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आरोग्यसेवा विभागाच्या पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार उपस्थित होते. आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: polio campaign will be implemented effectively says ajit pawar