ऐनवेळच्या पक्षांतरामुळे रंगले राजकीय नाट्य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय
पक्षांतराचे रंगलेले नाट्य, ऐनवेळी बदललेली उमेदवारी पत्रे आणि चर्चेतील उमेदवारांची समर्थकांसह मोठी संख्या, असे दृश्‍य होते घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील. विद्यमान नगरसेवकांसह काही इच्छुकांनी अपक्ष म्हणून भरलेले उमेदवारी अर्जही या वेळी चर्चेचे विषय ठरले.  

घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय
पक्षांतराचे रंगलेले नाट्य, ऐनवेळी बदललेली उमेदवारी पत्रे आणि चर्चेतील उमेदवारांची समर्थकांसह मोठी संख्या, असे दृश्‍य होते घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील. विद्यमान नगरसेवकांसह काही इच्छुकांनी अपक्ष म्हणून भरलेले उमेदवारी अर्जही या वेळी चर्चेचे विषय ठरले.  

रवींद्र धंगेकर विरुद्ध गणेश बिडकर, दत्ता बहिरट विरुद्ध रेश्‍मा भोसले, बाळासाहेब बोडके, सिद्धार्थ शिरोळे, मुकारी अलगुडे आणि राजू पवार आदी चर्चेतील इच्छुक अखेर उमेदवार झाले. त्यांच्या समर्थकांची संख्याही मोठी होती. क्षेत्रीय कार्यालयात पुणे विद्यापीठ- वाकडेवाडी (प्रभाग ७), डेक्कन जिमखाना- मॉडेल कॉलनी (प्रभाग १४) आणि कसबा पेठ- सोमवार पेठ (प्रभाग १६) येथील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले.
सकाळी दहा वाजता प्रशासकीय कामकाज सुरू झाले तरी, गर्दी सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच होती. एक-एक उमेदवार येत गेले, तसे क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारातील वातावरण बदलत गेले. राष्ट्रवादीतून -भाजपमध्ये, मनसेतून - शिवसेनेत, मनसेतून - राष्ट्रवादीत असे पक्षांतर उमेदवारी अर्ज भरताना झाले. त्यामुळे जमलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले होते.

उमेदवारी अर्ज भरताना अनेक पक्षांचे पदाधिकारी उमेदवारी पत्र (एबी फॉर्म) पोचविण्यासाठी धावपळ करताना दिसत होते. सूचक- अनुमोदकांचीही त्यामुळे घालमेल सुरू होती. चार सदस्यांच्या प्रभागात दोन- तीन उमेदवार निश्‍चित झाले तरी उर्वरित उमेदवारांसाठी अन्य उमेदवारांना वाट पाहावी लागत होती. उमेदवारांसोबत त्यांचे कुटुंबीय दिसत होते. काहींनी अपक्ष म्हणूनही अर्ज भरले, तर काही जणांचा वेळ ‘एबी फॉर्म’ची वाट पाहण्यात गेला. कडेकोट पोलिस बंदोबस्त असूनही गर्दीमुळे घोले रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत होती.

फटाके, घोषणा आणि शक्तिप्रदर्शन
टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालय

फटाक्‍यांचा आवाज... जोरदार घोषणाबाजी... कोणी शक्तिप्रदर्शन करत, तर कोणी सायकलवरून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले... असे वातावरण शुक्रवारी टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने अनुभवले.

जनता वसाहत-दत्तवाडी, वडगाव धायरी आणि हिंगणे-सनसिटी या तीन प्रभागांमधील उमेदवारांचे अर्ज टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात भरण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आणि त्यासाठीची मुदत तीन वाजता संपणार असल्याने बहुसंख्य उमेदवार पक्षाकडून जाहीर होणाऱ्या अधिकृत उमेदवारीच्या घोषणेची वाट पाहात होते. घड्याळाचा काटा मिनिटा-मिनिटाने पुढे जात असतानाच प्रत्येक उमेदवाराची अस्वस्थता वाढत होती. सकाळी अकरा वाजल्यापासूनच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी वाढू लागली होती. त्याच वेळी फटाक्‍यांच्या आवाजाने परिसर दुमदुमत होता. काही उमेदवार महागड्या गाड्यांमधून येऊन उमेदवारी अर्ज भरत होते, तर काहींनी इतर उमेदवारांपेक्षा स्वतःचे वेगळेपण ठळकपणे दाखवून देण्यासाठी सायकलवरून येऊन उमेदवारी अर्ज भरले.
राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारीचा ‘एबी’ फॉर्म वेळेत न मिळाल्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्ते अक्षरशः काकुळतीला आले होते. काही पक्षांनी उमेदवार जाहीर केल्याने ते आत्मविश्‍वासाने अर्ज भरत असल्याचे दिसत होते. शेवटच्या दिवशी येथून १३९ अर्ज भरले गेले.

शहराच्या वेगवेगळ्या प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. त्यामुळे आतापर्यंत काही उमेदवार आधीच्या पक्षातील नेत्यांचे छायाचित्र असलेल्या अंगठ्या किंवा लॉकेट घालत असत. पक्षांतरामुळे या उमेदवारांनी नवीन पक्षाच्या नेत्यांचे छायाचित्र असलेल्या दिमाखदार अंगठ्या घालून उमेदवारी अर्ज भरल्याचे निरीक्षण टिपण्यात आले.

देवाचे दर्शन घेऊन भरले अर्ज
धनकवडी  क्षेत्रीय कार्यालय

दुचाकी, चारचाकी गाड्यांचा ताफा...निवडणूक कार्यालयाबाहेर जमलेली पक्ष कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी...या गर्दीला हसतमुखाने अभिवादन करत अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात जाणारे प्रभाग क्रमांक ३८, ३९ आणि ४० मधील इच्छुक आणि त्यांचे सूचक व अनुमोदक... जमलेल्या गर्दीचे योग्य नियंत्रण करत, कामकाज सुरळीतपणे पार पाडेल याची दक्षता घेणारे पोलिस अधिकारी असे चित्र धनकवडी क्षेत्रीय कार्यालय येथे पाहावयास मिळाले.

शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना अशा सर्वच पक्षांतील इच्छुकांनी क्षेत्रीय कार्यालयात हजेरी लावली. या वेळी कोणी चारचाकी, कोणी दुचाकीवर तर कोणी कार्यकर्त्यांसह पदयात्रा करत आले. अर्ज भरण्यापूर्वी देवाचा आशीर्वाद मिळावा, यासाठी निवडणूक कार्यालयाजवळच असणाऱ्या देवीच्या मंदिरात जाऊन अनेकांनी दर्शन घेऊन ‘फोटोसेशन’ही केले.

कार्यालयामध्ये प्रभागानुसार अर्ज पडताळणी, अनामत रक्कम भरणा, अर्ज दाखल करणे अशी कामे निवडणूक कार्यालयातील अधिकारी काळजीपूर्वक करत होते. अर्ज भरण्यासाठी योग्य ती मदतही ते करत होते. अर्ज भरल्यानंतर थोडेसे ‘रिलॅक्‍स’ झालेल्या इच्छुकांशी नंतर आलेल्या इच्छुकांनी तुम्ही अर्ज भरलात का? प्रभागातील स्थितीबद्दल काय वाटते? अशी विचारपूस केली. निवडणूक कार्यालयाबाहेर अर्ज भरण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांसोबतच आपल्या प्रभागातील ‘सेलिब्रिटी’ इच्छुक, सर्वसामान्य इच्छुक कोण आहेत? हे पाहण्यासाठी बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती.

धावपळ, धक्काबुक्की
औंध क्षेत्रीय कार्यालय

‘अरे कागदपत्रं जोडली का’, ‘एबी फॉर्मचं नंतर बघू. आधी अर्ज भर’, ‘बाजूला सरका वहिनींना जाऊ द्यात’, असे इच्छुक आणि कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेले संवाद...आलिशान गाड्यांचा ताफा...समर्थकांची घोषणाबाजी...कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी कार्यकर्त्यांची सुरू असलेली धावपळ...अन्‌ काहीशा तणावग्रस्त चेहऱ्याने येरझऱ्या घालणारे इच्छुक, असे वातावरण औंध क्षेत्रीय कार्यालयात पाहायला मिळाले.

आज सकाळी सात वाजल्यापासूनच इच्छुक आणि त्यांचे कार्यकर्ते क्षेत्रीय कार्यालयाजवळ येऊ लागले होते. उमेदवारी अर्ज भरून घेण्यासाठी सुरवातीला इच्छुकांना टोकन देण्यात आले. त्याप्रमाणे एकेकाचा अर्ज भरून घेण्यात येईल, असे सांगण्यात आले; मात्र अवघ्या तासाभरात कार्यालयाजवळ इच्छुक आणि समर्थकांची झुंबड उडाल्याने ‘त्या’ क्षणाला हजर असणाऱ्या इच्छुकांचा अर्ज भरून घेतला जात होता. त्यामुळे किरकोळ वादावादी होत होती.  दुपारी बाराच्या सुमारास अर्ज भरण्यास मोठी गर्दी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग फुल्ल झाले होते. परिणामी औंध मुख्य रस्त्यात काही काळ वाहतूक कोंडीही झाली. कार्यकर्त्यांची झुंबड, परिणामी होणारी धक्काबुक्की, प्रवेशद्वारावर थांबलेल्या अधिकाऱ्यांशी होणारी वादावादी...अन्‌ अखेरच्या क्षणी उडालेली धांदल, असे चित्र पाहायला मिळाले.

पक्ष कार्यालयातून एबी फॉर्म मिळण्याच्या प्रतीक्षेत काही इच्छुक होते, तर काहींनी सकाळी लवकर एबी फॉर्मशिवाय अर्ज भरला आणि त्यानंतर काही वेळाने एबी फॉर्म जमा केला. पक्ष कार्यालयातून उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे अनेकांची आणि त्यांच्या समर्थकांची निराशा झाल्याचे पाहायला मिळाले; मात्र तरीही इच्छुकांनी अपक्ष अर्ज भरला. दुपारी तीनच्या ठोक्‍याला पोलिसांनी कार्यालयाचा मुख्य दरवाजा बंद केला आणि कार्यकर्त्यांना बाहेर काढले. त्यानंतरही कार्यालयात तीनपूर्वी हजर असणाऱ्या इच्छुकांची अर्ज भरण्याची प्रक्रिया काही तास सुरू होती.

Web Title: political drama