राजकीय वातावरण रंगू लागले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

कोथरूड - भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या इच्छुक उमेदवारांच्या या आठवड्यात होणाऱ्या मुलाखती, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कार्यक्रम, तर अन्य पक्षांकडून सुरू झालेला स्थानिक पातळीवरील प्रचार यामुळे कोथरूड परिसरातील राजकीय वातावरण रंगू लागले आहे. 

कोथरूड - भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या इच्छुक उमेदवारांच्या या आठवड्यात होणाऱ्या मुलाखती, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कार्यक्रम, तर अन्य पक्षांकडून सुरू झालेला स्थानिक पातळीवरील प्रचार यामुळे कोथरूड परिसरातील राजकीय वातावरण रंगू लागले आहे. 

मावळत्या वर्षाला निरोप देताना कोथरूड, कर्वेनगर परिसरात गेल्या पंधरवड्यातच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल झाली होती. लोकप्रतिनिधींबरोबरच निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले, त्यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यामुळे या कार्यक्रमांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन केले. त्या वेळी कोथरूड परिसरातून भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना कोथरूड आणि डेक्कन जिमखाना येथील पक्षाच्या नगरसेवकांनी आयोजिलेल्या कार्यक्रमात भाजप सरकारने पुण्याबाबत घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. मनसेच्या नगरसेवकांनी त्यांच्या भागात केलेल्या विकासकामांची पाहणी राज ठाकरे यांनी केली. त्याच वेळी पक्षाची स्थानिक पातळीवरील बांधणी मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला. वारजे परिसरांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांची उद्‌घाटने करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षांनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. भाजप आणि मनसेचे स्थानिक नेतेही त्यांच्या पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती या आठवड्यात घेणार असल्याने, सर्वच प्रभागातील लढतीचे चित्र स्पष्ट होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. 

प्रभागात विद्यमान लोकप्रतिनिधींसह कोणते राजकीय कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, याचा अंदाज स्थानिक नेते घेत आहेत. प्रभागातील एकाच गटात इच्छुक असलेले कार्यकर्ते आपणच कसे निवडून येऊ शकू, याची माहिती नेत्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार लक्षात घेत आपल्या पक्षातर्फे कोणते उमेदवार निवडणुकीसाठी उभे करावयाचे, याचे आडाखे नेते बांधू लागले आहेत. 

युती, आघाडी होणार का? 
नगरपालिकांच्या निवडणुकीतील भाजपची आघाडी लक्षात घेत, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी करून निवडणूक लढविणार का, याची चर्चा या पक्षांच्या कार्यकर्त्यांत सुरू आहे. त्याच वेळी नोटबंदीचा निवडणुकीवर नक्की काय परिणाम होणार, याचीही चर्चा कार्यकर्त्यांत सुरू आहे. भाजप-शिवसेनेची गेल्या तीन निवडणुकांतील युती यंदाही कायम राहणार की दोघेही विधानसभेप्रमाणे स्वतंत्र लढणार, या निर्णयाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयांवरच कोथरूड, कर्वेनगर परिसरांतील लढतीचे अंतिम चित्र अवलंबून असेल.

Web Title: The political environment