जुन्या नोटांवर इच्छुकांचा 'खेळ' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

पुणे : नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदी लागू झाली अन्‌ महापालिका निवडणूक स्वस्तात होणार अशी चर्चा सुरू झाली; पण सध्या इच्छुक उमेदवारांकडून आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम अन्‌ त्यासाठी फ्लेक्‍सबाजी सुरू असल्याने एवढा पैसा आला कोठून, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काही इच्छुक उमेदवारांनी जुन्या नोटा खर्च करण्यावर भर दिला आहे, तर काहींनी उधार आणि धनादेशांवर भर दिल्याची माहिती पुढे येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयाच्या नोट चलनातून रद्द केली. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. त्यासाठी त्यांची जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी धावाधाव सुरू झाली. बॅंकेत पैसे भरले; पण पैसे काढण्यावर मर्यादा आल्या. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीचा खर्च आटोक्‍यात राहील, अशी चर्चाही सुरू झाली. सध्या शहरात विविध ठिकाणी इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. एका मोठ्या कार्यक्रमाचा खर्च साधारणपणे पाच-लाख रुपयांच्या आसपास आहे. फ्लेक्‍सबाजीही जोरात सुरू झाली आहे. मतदारांपर्यंत पोचणे आणि जनसंपर्क वाढविण्यासाठी आयोजित केले जाणारे विविध उपक्रम अन्‌ स्पर्धांसाठी पैसा खर्च करावा लागत आहे. यासाठी मंडप, ध्वनिक्षेपक यंत्रणा, विद्युत व्यवस्था, आयोजनासाठी, किरकोळ कारणांसाठी पैसे खर्च करावे लागत आहेत. 

काही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहे. या वेळी काहींनी दोन ते तीन कोटी रुपये खर्च करण्याची तयारी नेत्यांसमोर दाखविली असल्याचे समजते. त्यामुळे नोटाबंदीच्या काळात एवढा पैसा कोठून आला, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अजूनही पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा व्यवहारात उपयोगात आणल्या जात आहेत. त्यामुळे या कार्यक्रमांसाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. व्यावसायिकही व्यवहाराचा विचार करून जुन्या नोटा स्वीकारत आहेत. या नोटा बॅंकेत भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत असल्याने त्या स्वीकारल्या जात आहेत. काही उमेदवारांनी उधारी ठेवली, तर काहींनी धनादेशावर भर दिला आहे. नवीन नोटा बदलून घेतल्याचा फायदाही काही जणांना होत आहे.

सध्या कार्यक्रम व उपक्रमांची संख्या जास्त दिसत असली, तरी पुढील काळात जुन्या नोटा चालणार नाहीत, त्यामुळे या कार्यक्रमांची संख्या रोडावलेली असेल, असे मत काही जण व्यक्त करत आहे.

Web Title: Political parties trying to use old notes for upcoming Pune Municipal Corporation elections