पुणेकरांच्या नळाचे पाणी रोखणारा आमदार कोण?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

दबाव टाकणारा आमदार कोण? हे सांगण्यात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नकार दिलाय. पण, पुणेकरांच्या नळाचे पाणी रोखणारा आमदार कोण? अशी चर्चा सध्या पुण्यात आणि सोशल मीडियावर सुरू झालीय.

पुणे - ऐन पावसाळ्यात नियोजनाचे कारण पुढे करीत शहराच्या बहुतांश भागांत लादलेली पाणीकपात ही जलवाहिन्यांतील दोषामुळे करावी लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तांत्रिक कारणासोबतच सत्ताधारी भाजपच्या एका आमदाराच्या दबावामुळेही वडगाव जलकेंद्रांतर्गत पाणीकपात करण्यात येत असल्याचे महापालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळेच सिंहगड रस्ता, कात्रज, कोंढव्यासह परिसरातील पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येत आहे. 

दरम्यान, दबाव टाकणारा आमदार कोण? हे सांगण्यात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नकार दिलाय. पण, पुणेकरांच्या नळाचे पाणी रोखणारा आमदार कोण? अशी चर्चा सध्या पुण्यात आणि सोशल मीडियावर सुरू झालीय.

शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे १०० टक्के भरल्याने पुरेसे पाणी मिळण्याची पुणेकरांना आशा होती. प्रत्यक्षात बहुतांशी भागांतील पाणीपुरवठा विस्कळित होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशातच पुन्हा वडगाव जलकेंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागांत एक दिवस पाणी बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू केली आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांना ऐन पावसाळ्यात अन्‌ तेही धरणे भरली असताना पाणीकपातीला तोंड द्यावे लागत आहे. 

जलवाहिन्यांतील त्रुटींमुळे पाणीपुरवठ्यात अडचणीत येतात. त्यामुळे या केंद्राअंतर्गत येणाऱ्या भागांतील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन आहे. ही कपात नाही.
- प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political pressure behind water cuts