चाकणला श्रेयवादाचे भूमिपूजन, चढाओढीचे राजकारण

Flax
Flax

चाकण (पुणे) : चाकण नगर परिषदेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन निवडणूक आचारसंहिता लागण्याअगोदर करण्यात येत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भूमिपूजनाचे फ्लेक्‍स आमने-सामने लागल्याने विकासकामांच्या श्रेयवादावरून सत्ताधारी शिवसेना व विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात चढाओढ लागली आहे.

विकासकामांचे दोनदा भूमिपूजन होत असल्याने नक्की कामे कोणी आणली, केली, याबाबत नागरिक मात्र संभ्रमात आहे. विकासकामांचे भूमिपूजन आमदार सुरेश गोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते करत आहेत. त्यामुळे दोघांत निवडणुकीच्या आधी श्रेयवादावरून लढाई सुरू आहे. चाकण नगर परिषदेच्या विविध प्रभागातील सुमारे पाच कोटींवर खर्चाच्या कामांचे भूमिपूजन सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते होणार असल्याचे फलक लावले गेले. तर त्या अगोदर सकाळी प्रभाग क्रमांक सतरा, वीस, एकवीसमधील व इतर कामांचे भूमिपूजन माजी आमदार मोहिते यांच्या हस्ते झाले. सत्ताधारी शिवसेनेचे नगराध्यक्ष शेखर घोगरे, उपनगराध्यक्ष धीरज मुटके यांनी व शिवसेनेच्या इतर नगरसेवकांनी प्रयत्न करून आमदार गोरेंच्या सहकार्याने विकासकामे केली असा सत्ताधारी शिवसेनेचा दावा आहे. त्यामुळे त्यांनी जाहिरातबाजी करून भूमिपूजन कार्यक्रम ठेवला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते जीवन सोनवणे, अपक्ष नगरसेवक प्रकाश भुजबळ, राष्ट्रवादीच्या नगरसेविका वृषाली देशमुख यांनी व इतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात शिवसेनेच्या भूमिपूजनाअगोदर विकासकामांचे भूमिपूजन केले. याबाबत विरोधी पक्षनेते सोनवणे, अपक्ष नगरसेवक भुजबळ यांनी सांगितले की, आम्ही पाठपुरावा केलेल्या कामांचे भूमिपूजन करण्याचे फलक सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने लावण्यात आले. त्यानंतर आमच्या विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमाचे फलकही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जागोजागी लावण्यात आले.

नगराध्यक्ष, नगरसेवकांतही श्रेयवाद
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश गोरे व माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यात नगर परिषदेच्या विकासकामांच्या भूमिपूजनावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे, असे चित्र चाकणला पाहावयास मिळत आहे. नगराध्यक्ष, नगरसेवकांतही विकासकामांच्या श्रेयवादावरून चढाओढ सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com