बदल ‘चेतना’दायी ठरेल काय?

Politics
Politics

भारतीय जनता पक्षाने सर्व बाजूंनी काबीज केलेल्या पुण्याला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेल्या काही महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून पक्षात संघटनात्मक पातळीवर काही बदल झाले. महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड हा त्याचाच एक भाग म्हणता येईल. वंदना चव्हाण या राज्यसभेवर खासदार म्हणून गेल्यापासून शहराध्यक्षपदाबाबत चर्चा होती; पण पक्षाध्यक्ष शरद पवार आणि पक्षनेते अजित पवार यांच्या पसंतीस पडणारा पर्याय समोर येत नसल्याने ही निवड लांबली होती. तुपे यांच्याकडे शहराची सूत्रे देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ‘पारंपरिक’ मतदारांचे पुन्हा एकदा लक्ष वेधले असले तरी, आगामी लोकसभा निवडणुकीतच या बदलाचा परिणाम समोर येईल. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे जयंत पाटील यांच्याकडे आल्यानंतर पक्षाला सांगली महापालिका निवडणुकीत पराभवाचा पहिला झटका बसला. सरकारविरोधी वातावरण असतानाही विरोधाची ही नाराजी मतपेटीपर्यंत पोचविण्यात यश आले नाही. या पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक पातळीवर अधिकाधिक बदल करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोचण्याची गरज राष्ट्रवादी काँग्रेसला प्रकर्षाने जाणवली असावी. त्यामुळेच पुणे, ठाण्यासह उरलेल्या शहराध्यक्षांच्या निवडी विशेष लक्ष देऊन केल्याचे दिसते. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस मागील दहा वर्षे सत्तेवर होती. उपनगराच्या परिसरात पक्षाने आपली पाळेमुळे रोवली होती; पण शहरी मतदारास खुणावणारी ‘स्वप्ने’ राष्ट्रवादीला दाखवता आली नाहीत. सहकारी संस्थांमधील राजकारणात मश्‍गूल असणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना शहरी मतदारांची नाडी ओळखता आली नाही. त्यामुळे पक्षाला लोकसभा, विधानसभा आणि महापालिका या सलग निवडणुकांमध्ये पराभवास सामोरे जावे लागले. सध्या महापालिकेत विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या राष्ट्रवादीचा आवाज क्षीण आहे. पुरेसे संख्याबळ नाही, या कारणामागे पक्षातील निष्क्रियता लपविण्याचा प्रयत्न झाला तरी, भाजपविरोधातील आवाज राष्ट्रवादीला अद्यापही बुलंद करता आलेला नाही, हे मान्य करावे लागेल. 

पुणे महापालिकेत तुलनेने नवख्या असणाऱ्या भाजपच्या सत्ताधाऱ्यांची योग्य मुद्‌द्‌यांवर कोंडी करता आलेली नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन एका बाजूला विरोधी पक्ष म्हणून महापालिकेच्या पातळीवर काम करणे आणि दुसरीकडे संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देणे, पराभूत मानसिकतेमध्ये असणाऱ्या पक्षाच्या पहिल्या फळीतील आजी-माजी नेत्यांना ‘चार्ज’ करणे, हे आव्हान नवे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्यासमोर राहणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसवर असणारा मराठा समाजाचा प्रभाव नाकारता येणार नाही; पण शहराचे आता पूर्णपणे बदललेले  स्वरूपही लक्षात घ्यावे लागेल. ‘आयटी’, ‘शिक्षण’ यांसारख्या क्षेत्रातील वाढीमुळे ‘थ्री सिक्‍टी’ अंशात बदललेल्या या ‘कॉस्मोपॉलिटन’ शहराची रचना लक्षात घेऊनच पक्षातही योग्य बदल करावा लागेल. पुण्यात ४० टक्‍क्‍यांच्या वर संख्या असणाऱ्या नवमतदाराला रोजच्या वाहतूक कोंडीतून सुटका हवी आहे. शांत आणि सुरक्षित भागात त्याला परवडणारे घर हवे आहे. रोजगाराच्या नव्या ‘संधी कोण उपलब्ध करून देतो’, याकडेही त्याचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे ‘जात’, ‘भावकी’, ‘माझा प्रभाग’ यापलीकडे जाऊन शहराला आकार देण्याची भाषा करणारे लोकप्रतिनिधी, पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसला तयार करावे लागतील. बूथ कमिट्या, हजारी प्रमुख ही निरंतर चालणारी प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षशिस्तीत मुरवावी लागेल, हे तुपे यांच्यासमोरील आव्हान असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com