मी शपथ घेतो की..!

संभाजी पाटील
रविवार, 4 ऑगस्ट 2019

‘मी शपथ घेतो... माझ्या शरीरात जोपर्यंत श्‍वास आहे, तोपर्यंत मी शरद पवार यांची साथ सोडणार नाही...’ पाच वर्षांपूर्वी राज्यात सत्तेत असणारा आणि त्यापूर्वी अनेक वर्षे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सत्ता उपभोगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला २०१९ मध्ये अशा प्रकारची शपथ देऊन कार्यकर्त्यांना भावनिक साद घालण्याची वेळ येईल, अशी कल्पना कोणी केली नसेल. पण हे घडलेय.

‘मी शपथ घेतो... माझ्या शरीरात जोपर्यंत श्‍वास आहे, तोपर्यंत मी शरद पवार यांची साथ सोडणार नाही...’ पाच वर्षांपूर्वी राज्यात सत्तेत असणारा आणि त्यापूर्वी अनेक वर्षे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सत्ता उपभोगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला २०१९ मध्ये अशा प्रकारची शपथ देऊन कार्यकर्त्यांना भावनिक साद घालण्याची वेळ येईल, अशी कल्पना कोणी केली नसेल. पण हे घडलेय. ज्यांनी एकनिष्ठ राहून पक्षाला अडचणीच्या काळात मदत करायला हवी होती, त्यांनीच उड्या मारल्या आहेत. त्यामुळे पक्षाने ‘युवा’ कार्यकर्त्यांना निदान ‘शपथ’ तरी दिली हे चांगले झाले...

पक्षात सुरू असलेली ही घसरण रोखण्यासाठी राष्ट्रवादीला घरातून अर्थात पुणे जिल्ह्यातून सुरवात करावी लागेल. ‘डॅमेज कंट्रोल’साठी पुणे शहर व जिल्हा उपयुक्त ठरू शकतो, पण त्यासाठी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली ‘तेच ते चेहरे पाहून वीट आला’ ही भावना गांभीर्याने घ्यावी लागेल. ‘अफजलखान स्वराज्यावर चालून आला, तेव्हा आदिलशाहीत सामील व्हा, आमचे मांडलिक व्हा, असे खलिते जात होते,’ असा दाखला नव्या दमाचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना दिला खरा. पण महाराष्ट्रातील सत्तांतरे पाहिली की फक्‍त पक्ष बदलला, आदिलशाही प्रवृत्ती पूर्वीचीच आहे, याची उजळणी सत्ताधारी आणि विरोधकांना करावी लागेल. मुळात पक्ष मोठा करायचा किंवा नवा पक्ष स्थापन करायचा, तर प्रस्थापितांना फोडून आपल्याकडे घ्यायचे हीच उदाहरणे महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येतात. मग त्याला कोणताच राजकीय पक्ष अपवाद नाही. 

ज्या वेगाने सध्या उड्या मारल्या जात आहेत, ते पाहता निश्‍चित काही तरी चुकते आहे, हे नक्की. त्याचा विचार करण्याचे सोडून केवळ ‘ईडी’ वा कशाची तरी भीती दाखवून लोक फोडले जात आहेत, या म्हणण्याला तितकासा अर्थ उरत नाही. पक्ष सोडून जाणारे वर्षानुवर्षे सत्तेला चिटकून बसलेले आहेत, ते कोणाला घाबरतील असे समजण्याचे कारण नाही. त्यामुळे पक्ष सोडून हे ‘सरंजामदार, सरदार, महाराज’ का जात आहेत, याचा आधी विचार करायला हवा आणि केवळ सत्तेचे गाजर पाहून आलेल्या लोकांमुळे पक्ष ‘शतप्रतिशत’ होतो, असे मानण्याचेही कारण नाही, कारण आलेल्या लोकांना सांभाळणे उद्या भाजप वा शिवसेनेला जड जाईल, हे वेगळे सांगायला नको!

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात मोदी लाट होती. पण त्यातही ज्यांचा जनतेशी संपर्क होता, ज्या ठिकाणी नवे प्रयोग करण्यात आले तेथे विरोधकांना यश आले आहे. शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने ‘घिसे-पिटे’ चेहरे बाजूला करून अमोल कोल्हे यांना संधी दिली. लोकांना बदल हवा होता. त्यांना या नव्या चेहऱ्यामध्ये आश्‍वासकता दिसली, त्यामुळे ते विजयीही झाले. आता गरज आहे, ती अशाच प्रयोगांची. 

पुण्याच्या युवा संसदेत स्वतः पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच ‘पक्षात तेच ते चेहरे, घराणेशाही, तेच ते पदाधिकारी पाहून आम्हाला वीट आला आहे’, असे स्पष्टपणे सांगितले. हीच भावना मतदारांमध्येही आहे. त्यामुळे स्वतः शरद पवार किंवा अजित पवार नव्यांना संधी देणार, असे सांगत आहेत. त्याची सुरवात या विधानसभा निवडणुकीपासून व संघटनेच्या पद वाटपांपासून झाली पाहिजे. 

पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता; पण पक्षात दुसरी फळी तयार झाली नाही. अजित पवार, दिलीप वळसे-पाटील या दिग्गज नेत्यांनी आपले सुरक्षित मतदारसंघ दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांकडे सोपवून स्वतः जिल्ह्यातील इतर अवघड जागी लढण्याचे धाडस दाखवायला हवे. याचा संदेश राज्यभर जाऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मरगळही दूर होईल. पक्षाला सावरण्याची सुरवात करण्याची संधी पुणे शहर आणि जिल्ह्यात नक्कीच आहे. प्रश्‍न आहे, तो नेत्यांना हे करायचे आहे का नाही, याचा! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics Oath Leader