भाजपच्या बालेकिल्ल्यात विरोधकांची आघाडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

शनिवार, सदाशिव पेठ प्रभागासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची व्यूहरचना
पुणे - महापालिकेच्या आगामी निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी होवो वा न होवो, पण भारतीय जनता पक्षाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभूत करण्याच्या इराद्याने किमान शनिवार पेठ-सदाशिव पेठेपुरती तरी आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

शनिवार, सदाशिव पेठ प्रभागासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची व्यूहरचना
पुणे - महापालिकेच्या आगामी निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी होवो वा न होवो, पण भारतीय जनता पक्षाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभूत करण्याच्या इराद्याने किमान शनिवार पेठ-सदाशिव पेठेपुरती तरी आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

भाजपच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्याच्या उद्देशाने व्यूहरचना आखताना तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरविण्याचे मोठे आव्हान या दोन्ही पक्षांसमोर राहणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शनिवार पेठ येथे भाजपचे पारंपरिक मतदार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अनेक निवडणुकांमध्ये याच पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. साहजिकच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यंत्रणेचा या भागात फायदा होत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या 30-35 वर्षांतील महापालिका निवडणुकीतील एखादा-दुसरा अपवाद वगळता या भागात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. त्यात, भाजपकडून बबनराव गंजीवाले, गोविंदराव मालशे, हरिभाऊ महाजन, त्रिंबकराव आपटे, शिवाजीराव आढाव, आण्णा जोशी यांच्यापासून विश्‍वास गांगुर्डे, विजय काळे तसेच विकास मठकरी, मुक्ता टिळक यांच्यापर्यंतच्या प्रतिनिधींनी याच भागाचे प्रतिनिधित्व केले आहे. या भागातून कॉंग्रेसचे गोपाळ तिवारी आणि डॉ. सतीश देसाई निवडून आले होते.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या नव्या रचनेत शनिवार पेठ-सदाशिव पेठ हा प्रभाग तयार झाला आहे. भाजपच्या मुक्ता टिळक, हेमंत रासने, दिलीप काळोखे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपाली पाटील यांचे जुने प्रभाग यात एकत्र आले आहेत. या प्रभागातील चारही जागा जिंकण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे; तर वर्षानुवर्षांचे भाजपचे वर्चस्व संपविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस एकत्र येऊन सक्षम उमेदवार देण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगण्यात आले. प्रभागात आघाडी करून उमेदवार देण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये प्राथमिक चर्चा झाली असून, त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

यासंदर्भात विचारणा केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण म्हणाल्या, 'निवडणुकीच्या दृष्टीने वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. या प्रभागात आघाडी करण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. '

Web Title: politics in pune municipal election