फोडाफोडीपासून सावधान!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

पुणे - ‘‘निवडणुका तोंडावर आल्याने विरोधक फोडाफोडीचे राजकारण करीत आहेत. आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना जवळ करीत आहेत. पक्ष ज्याला कोणाला तिकीट देईल, त्याचेच काम करा. तिकीट मिळाले नाही, तर नाराज होऊ नका,’’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी महापालिकेच्या निवडणुकीत एकदिलाने काम करण्याचा संदेश पक्षातील इच्छुकांसह कार्यकर्त्यांना शनिवारी दिला. 

पुणे - ‘‘निवडणुका तोंडावर आल्याने विरोधक फोडाफोडीचे राजकारण करीत आहेत. आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना जवळ करीत आहेत. पक्ष ज्याला कोणाला तिकीट देईल, त्याचेच काम करा. तिकीट मिळाले नाही, तर नाराज होऊ नका,’’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी महापालिकेच्या निवडणुकीत एकदिलाने काम करण्याचा संदेश पक्षातील इच्छुकांसह कार्यकर्त्यांना शनिवारी दिला. 

महापालिकेच्या निवडणुकीत पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती निसर्ग मंगल कार्यालयात झाल्या. पवार यांच्यासह, खासदार सुप्रिया सुळे, महापौर प्रशांत जगताप, पक्षाच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड या वेळी उपस्थित होते. खडकवासला, कोथरूड, शिवाजीनगर आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. मुलाखतीसाठी आलेल्या इच्छुकांचे काम, जनसंपर्क आणि तिकीट का द्यावे, याची कारणे पवार यांनी या वेळी जाणून घेतली. ‘‘तिकीट मिळाले नाही तर, काय भूमिका घेणार,’’ असा प्रश्‍नही ते इच्छुकांना विचारत होते. 

पवार म्हणाले, ‘‘आगामी निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याच्या उद्देशाने प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. 

पक्षावरील निष्ठा कायम ठेवून निवडणुकीत एकत्र येऊन काम करा. त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे. तिकीट मिळाले नाही, म्हणून नाराज न होता, उत्साहाने काम करा. त्याची फळे मिळतील.’’  

अनुभवींना विचारले नाहीत प्रश्‍न !  
महापालिकेतील पक्षाच्या आजी-माजी पदाधिकारीही मुलाखतीसाठी आले होते. परंतु, नव्या इच्छुकांची संख्या अधिक असल्याने आजी-माजी पदाधिकाऱ्यांना कोणतेही प्रश्‍न विचारण्यात आले नाहीत. कामाचा अनुभव, पदावर असताना चांगली कामे केली असल्याचे सांगत अजित पवार यांनी या पदाधिकाऱ्यांना प्रश्‍न विचारले नाहीत.

इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन
शहरातील चारही विधानसभा मतदारसंघांतील विद्यमानांसह इच्छुकांनी मुलाखती दिल्या. गळ्यात उपरणे, हातात कार्य अहवाल, ढोल-ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, अशा वातावरणात इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पक्षातील नवख्या इच्छुकांनी आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यात तरुणांचा समावेश होता. 

सुमारे २४० इच्छुकांच्या मुलाखती
निसर्ग मंगल कार्यालयात सकाळी नऊच्या सुमारास सुरू झालेला मुलाखतींचा कार्यक्रम सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत सुरू होता. खडकवासला, कोथरूड, शिवाजीनगर आणि वडगाव शेरी मतदारसंघांतील विविध प्रभागांमधील सुमारे २४० इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले. बिबवेवाडीतील रासकर पॅलेसमध्ये रविवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून मुलाखती होतील. येथे पर्वती, पुणे कॅंटोन्मेंट, कसबा आणि हडपसर मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

Web Title: politics in pune municipal election