इंदापुरात पाण्यावरून कलगीतुरा

पाटबंधारे विभागाने कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांना पाठविलेले पत्र.
पाटबंधारे विभागाने कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांना पाठविलेले पत्र.

वालचंदनगर - माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील कालवा सल्लागार समितीचे सदस्य नसतील, तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. मात्र, ते सदस्य असतील, तर ते राजकीय संन्यास घेणार का? असा पलटवार आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पाटील यांच्यावर केला.

हर्षवर्धन पाटील यांच्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व भरणे यांनी पाण्याच्या प्रश्‍नावरून गेल्या दोन दिवसांपूर्वी टीका केली होती. भरणे यांच्या टीकेला पाटील यांनी उत्तर देताना पाणी आणता येत नसेल, तर खुर्ची खाली करण्याचे आव्हान देऊन कालवा सल्लागार समितीचे सदस्य नसल्याचे सांगितले होते. यावरती भरणे यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील कालवा सल्लागार समितीचे सदस्य असल्याच्या पुराव्याचे पत्र दिले आहे.

पाटील हे सध्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. पुण्याच्या पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी २८ सप्टेंबर रोजी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षांना लेखी पत्र पाठवून खरीप हंगामाचे पिण्याचे व सिंचनासाठीचे पाणी वापराचे नियोजनासाठी बैठकीला ४ ऑक्‍टोबर रोजी उपस्थित राहण्याची विनंती केली होती. सदरच्या पत्रावर कारखान्याने पोचही दिली आहे. यांसदर्भात भरणे यांनी सांगितले, की पाटबंधारे विभागाने कर्मयोगीच्या अध्यक्षांना बैठकीला बोलाविले म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनाच बोलाविले होते. मात्र, पाटील यांना तालुक्‍यातील जनतेचे देणे-घेणे नसून केवळ पाण्याचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करावयाची आहे. पाण्यासाठी रस्त्यावर बसण्याऐवजी बैठकीला येऊन बसले असते, तर पाण्याचा प्रश्‍न तरी समजला असता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालकमंत्री होते म्हणून इंदापूर तालुक्‍याला पाणी मिळत होते. यामध्ये पाटील यांचा काडिमात्र संबंध नाही. चालू वर्षी ऐन उन्हाळ्यामध्ये कालव्याच्या इतिहासामध्ये ११३ दिवस सलग कालवा सुरू होता. तालुक्‍यातील शेतकऱ्यांना जास्तीजास्त पाणी देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे.

सर्वसामान्यांनी दिलेली खुर्ची आहे?
१९ वर्षांच्या कालावधीला कंटाळून तालुक्‍यातील सर्वसामान्य जनतेने मला खुर्ची दिली आहे. तो काढून घेण्याचा अधिकार फक्त जनतेलाच आहे. खुर्चीच्या विषयावर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. येणाऱ्या काळामध्ये ही जनता अशा भूलथापांना बळी पडणार नाही, अशा शब्दांत आमदार दत्तात्रेय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com