फोडाफोडीच्या राजकारणावर ठरणार उमेदवार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे प्राबल्य असलेल्या विमाननगर- सोमनाथनगर भागात दोन्ही कॉंग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चुरस आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांच्यासह नगरसेविका उषा कळमकर याच प्रभागातून लढण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसला रोखण्यासाठी याच पक्षातील कार्यकर्त्यांना फोडून ताकद अजमावण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल. 

नगरसेवक अनिल टिंगरे, रेखा टिंगरे (प्रभाग 1) उषा कळमकर, महादेव पठारे (प्रभाग 3) आणि कर्णे गुरुजी, मीनल सरवदे (प्रभाग 17) यांच्या जुन्या प्रभागातील काही भाग एकत्र आल्याने नव्या रचनेत विमाननगर-सोमनाथनगर हा प्रभाग तयार झाला आहे. जुन्या तिन्ही प्रभागांमधील नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच आहेत. या प्रभागात अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), खुल्या गटातील महिला आणि खुल्या गटासाठी आरक्षण आहे. 

महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे यश मिळाले असले तरी, कॉंग्रेसच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. प्रस्थापितांचे आव्हान मोडीत काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने जुळवाजुळव सुरू केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील गटतट आणि त्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीचा फायदा घेण्याचा भाजप, शिवसेनेचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कामे केल्याची चर्चा असल्याने विद्यमानांना स्वपक्षातील धोका पत्करावा लागण्याची चर्चा आहे. हीच बाब भाजपच्या पथ्यावर पडेल, अशी आशा या पक्षातील नेत्यांना आहे. त्यामुळे भाजपकडून जुने- नवे कार्यकर्ते निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. 

मध्यमवर्ग, झोपडपट्ट्या, सोसायट्यांच्या या प्रभागात आपल्यालाच कौल 
मिळेल, अशी आशा सर्वच राजकीय पक्षांना आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला मतदारांनी चांगली साथ दिल्याने ऐन निवडणुकीच्या काळात पक्षांतर होण्याची शक्‍यता आहे. सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांना फोडून त्यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याची खेळी विरोधकांची असेल, असे सांगितले जात आहे.

Web Title: Politics would be a candidate