केडगावच्या मुलींना संरक्षणाची ओवाळणी

रमेश वत्रे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

सुभाष बाबूराव महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी यवत पोलिसांना राखी बांधल्यानंतर त्यांचे संरक्षण हीच आमची ओवाळणी राहील. मी यवतला असेपर्यंत मुलींच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. अशी ग्वाही यवतचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली आहे.

केडगाव (ता.दौंड)- येथील सुभाष बाबूराव महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी यवत पोलिसांना राखी बांधल्यानंतर त्यांचे संरक्षण हीच आमची ओवाळणी राहील. मी यवतला असेपर्यंत मुलींच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. अशी ग्वाही यवतचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली आहे.

सुभाष कुल महाविद्यालयात बंडगर व त्यांच्या सहकार्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्यातील भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलींनी पोलिस निरीक्षक सूरज बंडगर व पत्रकारांना राखी बांधली. त्यावेळी बंडगर यांनी विद्यार्थिनींच्या संरक्षणाची ग्वाही दिली. यावेळी, नेताजी शिक्षण संस्थेचे सचिव धनाजी शेळके, प्राचार्य डॉ. गोविंदराजे निंबाळकर आणि संपत मगर उपस्थित होते. 

बंडगर म्हणाले की, मुलींनी त्रास सहन न करता धाडस करून पोलिस, पालक किंवा शिक्षकांना या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. टपोरी मुलांबद्दल माहिती दिली तर माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल. शाळा महाविद्यालयात मुलींसाठी तक्रारी पेटी व पोलिसांसाठी व्हिजीट बुक ठेवले जाईल. छेडछाडीशिवाय कौटुंबिक तक्रारी असल्या तरी मला हाक द्या. मी घरी येऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करीन. निराधार, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी मदत केली जाईल. चुकीचे काम करू नका आणि कोण करीत असेल तर त्याला करू देऊ नका असा निश्चय करा. एखाद्या गंभीर प्रकारात पिडीत मुलगी किंवा पालक तक्रार देत नसतील तर आमच्या कारवाईला मर्यादा येतात. मुलींना त्रास देणा-यांची गय केली जाणार नाही. यावेळी प्राचार्य डॉ. गोविंदराजे निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा.अनुराधा गुजर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. तन्वीर शेख यांनी आभार मानले.

Web Title: poliuce gave a promise to protect girls at Rakshabandhan