जलचरांचा श्‍वास कोंडला ! 

जलचरांचा श्‍वास कोंडला ! 

पुणे - "सांडपाण्याचा प्रत्येक थेंब प्रक्रिया करूनच नदीत सोडावा', या जनजागृतीसाठी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी राज्यात सातत्याने मोहिमा राबविल्या... त्यावर हजारो कोटी रुपये खर्च झाले... पण स्थानिक स्वराज्य संस्था आणि उद्योग मात्र ढिम्म! परिणामी, देशातील सर्वाधिक 49 प्रदूषित नद्या राज्यातून वाहत आहेत. राज्यातील सुमारे 45 टक्के जलप्रवाहांमध्ये जलचरांचा श्‍वास कोंडला जात आहे. 

केंद्रीय जल आयोजाने (सीडब्ल्यूसी) गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात देशभरातील नद्यांच्या प्रदूषणाचे चित्र मांडले आहे. नद्यांमधील "बायोकेमिकल ऑक्‍सिजन डिमांड'च्या (बीओडी) आधारावर तपासणीत देशातील 302 नद्या प्रदूषित असल्याचे भीषण वास्तव समोर आले. राज्यातील गोदावरी, वैनगंगा आणि वर्धा या नद्या सर्वाधिक प्रदूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदूषणाच्या आधारे नद्यांची एक ते पाच गटांत वर्गवारी केली आहे. 

जलचरांसाठी धोकादायक नद्या 
- कोकण - उल्हास, कुंडलिका, भास्ता, वशिष्ठी, मिठी, अंबा, सूर्या, पाताळगंगा, पेहलार, सावित्री, वैतरणा 
- पश्‍चिम महाराष्ट्र - भीमा, कृष्णा, पंचगंगा, नीरा, कोयना, घोड, इंद्रायणी, मुळा, मुठा, पवना, सीना, उरमोडी, वेल, वेण्णा 
- उत्तर महाराष्ट्र - गोदावरी, तापी, गिरणा, रानगवळी, दारणा, गोमाई, हिवारा, मोर, मुर्ना, पांजरा, वाघूर 
- मराठवाडा - बिंदूसरा, मांजरा 
- विदर्भ - वेणा, वैनगंगा, चंद्रभागा, कन्हान, अमरावती, पेढी, पैनगंगा, पूर्णा, वर्धा 

"बीओडी' आणि तपासणी! 
नद्यांमध्ये सांडपाणी सोडल्यामुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण घटते. त्यामुळे जलचरांची प्राणवायूची मागणी वाढते. त्याला "बीओडी' म्हणतात. हे प्रमाण जितके जास्त, तितके नदीतील प्रदूषण जास्त! या सर्वेक्षणात नद्यांच्या वेगवेगळ्या भागातील पाण्याचे नमूने घेऊन "बीओडी'चे प्रमाण नोंदविले. प्रतिलिटर पाण्यात 30 पेक्षा अधिक "बीओडी' असणे म्हणजे नदीचे आरोग्य धोक्‍यात असणे असे मानले जाते. 

बीओडी (मिलिग्रॅम प्रतिलिटरमध्ये)....... प्राधान्यक्रम 
30 पेक्षा जास्त ........... 1 
20 ते 30 ..................2 
10 ते 20 ..................3 
6 ते 10 ................... 4 
3 ते 6 ...................... 5 

महाराष्ट्रातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या - 218 
एकूण लांबी - 18 हजार किमी 
प्रदूषित नद्या - 49 
प्रदूषित नद्यांची लांबी - 8,310 किमी 
देशातील प्रमुख नद्या - 3271 
प्रदूषित नद्या - 302 

""देशातील सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात आहेत. त्यातून नद्यांमध्ये पाणी सोडले जात नाही. त्यामुळे नद्यांमधील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. त्यातच कोणतीही प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्या आहेत. शहरीकरणामुळे वाढलेल्या पाण्याच्या गरजेतून सांडपाण्याचे प्रमाणही वाढले आहे.'' 
आर. एम. भारद्वाज, जल गुणवत्ता व्यवस्थापक आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी दिल्ली. 

""राज्यातील 98 टक्के नदी प्रदूषण हे प्रमुख शहरांच्या परिसरात होते. प्रवाहित नसलेल्या नद्यांच्या पात्रात सांडपाणी सोडले जात असल्याने प्रदूषण वाढते. त्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र बसविण्याच्या नोटिसा महापालिकांना बजावण्यात आल्या आहेत. नद्यांमधील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी तातडीने उपाय हाती घेतले आहेत. त्यामुळे राज्यातील प्रदूषित 49 पैकी 15 नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यात यश मिळाले आहे.'' 
- यशवंत सोनटक्के, सहसंचालक (जल), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com