बळिराजाला डाळिंबाचं बळ!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

पुणे - मार्केट यार्ड येथील फळ बाजारात डाळिंबाची सरासरी प्रतिदिन ८० ते १०० टन आवक होत आहे. मागणी चांगली असल्याने भावात विशेष बदल झाला नाही. उत्पादन जास्त होऊनही बळिराजाला डाळिंब बळ देत असल्याने त्यांच्यात खुशीचे वातावरण आहे.

पुणे - मार्केट यार्ड येथील फळ बाजारात डाळिंबाची सरासरी प्रतिदिन ८० ते १०० टन आवक होत आहे. मागणी चांगली असल्याने भावात विशेष बदल झाला नाही. उत्पादन जास्त होऊनही बळिराजाला डाळिंब बळ देत असल्याने त्यांच्यात खुशीचे वातावरण आहे.

हमखास उत्पन्न मिळवून देणारे उत्पादन म्हणून डाळिंबाची गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात आहे. देशात सर्वांत जास्त डाळिंबाचे उत्पादन महाराष्ट्रात होत आहे. सोलापूर, पुणे, नाशिक, नगर, मराठवाडा भागांत डाळिंबाचे उत्पादन घेतले जात आहे. महाराष्ट्रातील बाजारात वर्षभर डाळिंब विक्रीस उपलब्ध असते. पुणे जिल्ह्यातही डाळिंबाची लागवड वाढली आहे. यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांत बाजारात डाळिंबाची आवक वाढत आहे. सध्या पुण्याच्या बाजारात प्रतिदिन सरासरी ८० ते १०० टन आवक होत आहे. मागणी टिकून असल्याने भावात विशेष फरक पडला नाही; परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव कमी असल्याचे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले. 

‘‘आंब्याचा हंगाम संपल्यानंतर डाळिंबाचा हंगाम सुरू झाला. श्रावण महिना सुरू होताच फळांच्या मागणीत वाढ होत असते. डाळिंबाला महाराष्ट्रातील बाजाराप्रमाणे इतर राज्यांतून चांगली मागणी आहे,’’ असे व्यापारी तानाजी चौधरी यांनी नमूद केले.

उत्पादनात महाराष्ट्र अव्वल
 पुण्यातील बाजारात भगवा, आरक्ता, गणेश हे डाळिंबाचे वाण मिळतात. त्याचे रुबी आणि मृदुला हेदेखील वाण आहेत.
 डाळिंब निर्यातीत भारत जगात प्रथम, स्पेन आणि इराण यांच्याशी स्पर्धा, सौदी अरेबिया, युरोपीयन देशांत निर्यात जास्त
  एकूण उत्पादनात देशात महाराष्ट्राचा वाटा निम्म्याहून अधिक. त्याखालोखाल आंध्र प्रदेश आणि गुजरात.

Web Title: Pomegranate farmer