शहरी गरीब वैद्यकीय योजनेचा निराधार मुले, वृद्धांनाही लाभ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

पुणे - महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय साह्य योजनेचा लाभ आता निराधार मुले आणि वृद्धांना मिळू शकणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला महिला व बाल कल्याण समितीने नुकतीच मान्यता दिली. स्थायी समिती आणि मुख्यसभेची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी सुरू होईल. योजनेसाठी आर्थिक तरतूद वाढविण्याची मागणी स्थायी समितीकडे केली आहे. 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका शहरी गरीब वैद्यकीय योजना राबविते. वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत असणाऱ्यांना किडनीचे विकार, हृदयरोग, कर्करोग आदी आजारांसाठी महापालिकेच्या पॅनेलवरील खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत ही मदत दिली जाते. महापालिका हद्दीतील वृद्धाश्रमांमधील ज्येष्ठ नागरिकांना आणि अनाथ आश्रमांतील २५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांचा या योजनेत समावेश करावा, असा प्रस्ताव काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक अविनाश बागवे यांनी दिला होता. 

या प्रस्तावावर समितीने निर्णय घेतला असून, या व्यक्तींना उत्पन्नाची अट शिथिल करावी, संबंधित संस्थेचे वास्तव्यासंबंधीचे प्रमाणपत्र अनिवार्य करावे, असे त्यात नमूद केले होते. या प्रस्तावावर प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिला होता, अशी माहिती समितीच्या अध्यक्ष राजश्री नवले यांनी दिली. पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला आहे.

Web Title: poor medical scheme helpless child old people