गरीब रुग्णांसाठी आरोग्यदायी ‘लॅबोरेटरी’

वैशाली भुते
रविवार, 16 एप्रिल 2017

राज्य सरकारचा उपक्रम; अत्यावश्‍यक महागड्या ४७ चाचण्यांचा समावेश

पिंपरी - गरीब आणि गरजू रुग्णांना अधिकाधिक मोफत सेवा देण्याच्या दृष्टीने राज्य आरोग्य खात्याने ‘लॅबोरेटरी सर्व्हिसेस’ प्रकल्पांतर्गत नुकताच एका कंपनीशी करार केला आहे. साडेचारशे कोटी रुपयांचा हा करार असून त्याअंतर्गत अनेक अत्यावश्‍यक व महागड्या ४७ चाचण्यांचा समावेश करण्यात आला आहे. सरकारचे राज्यभरातील सर्व दवाखाने आणि रुग्णालये (सर्व परिमंडळ) या कराराशी जोडण्यात आली आहेत. या चाचण्यांमुळे रोगाचे लवकर निदान होऊन प्रभावी उपचारपद्धती राबविणे शक्‍य होणार आहे.

सरकारचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ‘हिंदुस्तान लॅटेक्‍स लिमिटेड’ (एचएलएल) यांच्यामध्ये मार्चमध्ये हा करार झाला. एक एप्रिलपासून तो लागू झाला असून पहिल्या टप्प्यात औंध येथील जिल्हा रुग्णालय, येरवडा मेंटल हॉस्पिटल आणि पौड येथील ग्रामीण रुग्णालयात त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याअंतर्गत औंध सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या करण्यात येत आहेत. चिंचवड येथे संबंधित कंपनीच्या प्रयोगशाळा उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सद्यःस्थितीला प्रायोगिक तत्त्वावर काही मोजक्‍या तपासण्या करण्यात येत आहेत. प्रयोगशाळेचे काम पूर्ण झाल्यानंतर करारामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
टेक्‍निशियन स्तरावरील सर्व चाचण्या चिंचवड येथील प्रयोगशाळेत होणार असल्या तरी ‘हिस्टो पॅथॉलॉजी’ प्रकारातील चाचण्या कंपनीच्या खारघर येथील प्रयोगशाळेतूनच केल्या जाणार असल्याचे समजते. 

मृत्युदर कमी होण्यास फायदा
सद्यःस्थितीला रुग्णालयांतर्गत सुमारे ४० प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. 

राजीव गांधी जीवनदायी योजना, ज्येष्ठ नागरिक, १८ वर्षांखालील बालके अशा अनेक सामाजिक घटकांना ही सेवा मोफत दिली जाते. तथापि, काही नवीन महत्त्वपूर्ण चाचण्या गरीब रुग्णांना परवडण्यासारख्या नाहीत. त्यामुळे सरकारने संबंधित लॅबोरेटरी कंपनीशी हा करार केला आहे. त्याचा विशेषतः मृत्युदर कमी करण्यासाठीही त्याचा फायदा होणार आहे. 

समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती
डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार नमुने संकलित करण्यासाठी संबंधित कंपनीकडून समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे अधिकारी लॅबोरेटरी कंपनी, सरकार आणि रुग्णालयामध्ये समन्वय साधतील. कोणत्या रुग्णालयासाठी कोणते अधिकारी असावेत, याच्या सूचनाही सरकारतर्फे देण्यात आल्या आहेत. 
 
संस्था    समन्वय अधिकारी
प्राथमिक आरोग्य केंद्र    वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्‍निशियन, फार्मासिस्ट
शंभरहून कमी खाटांचे रुग्णालय  वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्‍निशियन
शंभरहून अधिक खाटांचे रुग्णालय    पॅथॉलॉजिस्ट, लॅब टेक्‍निशियन
 
Web Title: poor patient healthy laboratory