धक्कादायक! पालिकेच्या रुग्णालयातून गरीब रुग्णांची औषधे गायब

सकाळ वृत्तसेवा
03.41 AM

आर्थिकदृष्ट्या गरीब रुग्णांना औषधे विकत घेण्याचा सल्ला महापालिकेच्या रुग्णालयात दिला जात आहे. ही व्यवस्था सुधारण्याबाबत आरोग्य प्रमुखांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक रुग्णाला वेळेत उपचार आणि औषधे देण्याबाबत सांगण्यात आले आहे. यासंदर्भात महापौर आणि आयुक्तांशी चर्चा केली आहे.
- डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती

पुणे - आर्थिकदृष्ट्या गरीब रुग्णांना उपचारासह त्यांना मोफत औषधे देण्यासाठी महापालिका वर्षाला दीडशे कोटी रुपये खर्च करीत असल्याचा हिशेब दाखवते. मात्र, याच महापालिकेची रुग्णालये आणि दवाखान्यांतील डॉक्‍टर रुग्णांना बाहेरून औषधे विकत घेण्याचा सल्ला देत असल्याचे डझनभर प्रकार उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे, हा सगळा प्रकार महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पाहिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. ज्योत्स्ना एकबोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या पाहणीतून आरोग्य खात्यातील गोंधळ पुढे आला आहे. 
आर्थिकदृष्ट्या गरीब रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी महापालिकेतर्फे विविध योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत वर्षाला साधारणपणे ३६ कोटी रुपयांची औषधे खरेदी केली जातात. महापालिकेच्या स्टोअरसह प्रत्येक रुग्णालये आणि दवाखान्यात ही औषधे उपलब्ध असतात; परंतु बहुतांशी डॉक्‍टर ही औषधे उपलब्ध नसल्याचे सांगून बाहेरील औषधे विकत घेण्यास भाग पाडत असल्याच्या तक्रारी आहेत. समितीच्या सर्व सदस्यांनी कमला नेहरू रुग्णालयासह काही दवाखान्यांची बुधवारी पाहणी केली. त्या वेळी रुग्णांना औषधे दिली जात नसल्याचे दिसून आले. आरती कोंढरे, मनीषा लडकत, स्वप्नाली सायकर, रत्नप्रभा जगताप, डॉ. श्रद्धा प्रभुणे आदी उपस्थित होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poor patient medicines disappear from municipal hospitals