गरीब रुग्णांना आता वेळेत उपचार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

गरीब रुग्णांना तातडीने दाखल करून घेऊन त्यांच्यावर उपचार करण्याबाबत खासगी रुग्णालयांच्या व्यवस्थापनाला सूचना करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी सांगितले. शहरी गरीब योजनेसाठी वर्गीकरणाद्वारे पुरेसा निधी दिला जाईल; यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळतील, असेही त्यांनी नमूद केले.

पुणे - गरीब रुग्णांना तातडीने दाखल करून घेऊन त्यांच्यावर उपचार करण्याबाबत खासगी रुग्णालयांच्या व्यवस्थापनाला सूचना करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी सांगितले. शहरी गरीब योजनेसाठी वर्गीकरणाद्वारे पुरेसा निधी दिला जाईल; यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळतील, असेही त्यांनी नमूद केले.

शहरात गेल्या काही दिवसांपासून विषाणूजन्य आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढली असून, शहरी गरीब योजना लागू असलेली रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याकडे लक्ष वेधत सर्वपक्षीय सदस्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तक्रारींचा पाढाच वाचला. शहरी गरीब योजना बंद आहे का? अशी विचारणा करीत, रुग्णांना औषधे मिळत नाहीत, महापालिकेच्या रुग्णालयांत डॉक्‍टर आणि कर्मचारी भेटत नसल्याचे मुद्दे सदस्यांनी मांडले.

शहरी गरीब योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दुसरीकडे मात्र, आर्थिक तरतूद कमी पडत असल्याने काही रुग्णालयांचे बिल थकल्याचे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सभागृहात सांगितले. त्यानंतर राव यांनी खुलासा केला. राव म्हणाले, ‘‘या योजनेतून काही आजारांच्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळत आहे. परंतु, आता तरतूद कमी पडल्याने वर्गीकरणाद्वारे तातडीने निधी उपलब्ध केला जाईल.’

शहरी गरीब योजनेचा खर्च
४० कोटी - २०१६-१७
४५ कोटी - २०१७-१८
२२ कोटी - २०१८-१९


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poor Patient Treatment Private Hospital