पीओपीचा पुनर्वापर शक्‍य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

पुणे - प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) व्यवस्थित भाजले, दळले आणि पुन्हा पावडर केल्यास त्याचा पुनर्वापर करणे शक्‍य होईल, अशाप्रकारचे पीओपीच्या पुनर्वापराचे तंत्रज्ञान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर एक टन पीओपीवर प्रक्रिया करून त्यातून पुन्हा ८०० किलो पीओपी तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे. 

पीओपीचा वापर करून घडविण्यात येणाऱ्या विविध कलाकृती आणि सजावट हा सर्वांच्याच औत्सुक्‍याचा विषय असतो; मात्र त्याच पीओपीचा पुन्हा वापर करता येत नसल्याने त्यामुळे होणारा कचरा आणि परिणामी होणारे प्रदूषण हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या समस्येवर विद्यापीठातील ‘सायन्स पार्क’ विभागाने तोडगा काढला आहे. ‘सायन्स पार्क’मधील संशोधकांनी शोधून काढलेल्या प्रणालीनुसार पीओपी भाजणे, दळणे आणि चाळणे अशी सोपी प्रक्रिया विशिष्ट प्रकारे केल्यास त्यापासून पुन्हा पीओपी तयार करून त्याचा पुनर्वापर करणे शक्‍य आहे, असे प्रयोगाचे संचालक आणि संशोधक डॉ. जयंत गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या संशोधनासाठी सोनाली म्हस्के यांनीही काम केले आहे.

पीओपीचा पुनर्वापर शक्‍य असल्याने पर्यावरणावरील ताण काहीसा कमी होणार आहे. मूर्ती विसर्जनामुळे होणारे पाण्याचे प्रदूषण टाळता येईल. तसेच प्रक्रिया करून तयार झालेल्या पीओपीपासून पुन्हा मूर्ती बनविणे, नक्षीकाम आणि खोलीचे रंगकाम करण्यापूर्वी भिंती लिंपणे, तसेच इतर सजावटीची कामे करता येणार आहेत, असे डॉ. गाडगीळ यांनी सांगितले.

विद्यापीठातील ‘सायन्स पार्क’ने हा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या पुनर्वापराचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर केला होता; परंतु हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर न राहता प्रत्यक्षात यावा, यासाठी गणेश मंडळे, महापालिका, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.
- डॉ. जयंत गाडगीळ, संशोधक

Web Title: POP reuse