सकारात्मक अर्थसंकल्प

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

पुणे - स्टार्ट अप क्षेत्रासाठी केलेल्या निवडक व उपयुक्त घोषणांमुळे नवउद्योजकांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. स्टार्टअप क्षेत्रासाठी ते सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.

पुणे - स्टार्ट अप क्षेत्रासाठी केलेल्या निवडक व उपयुक्त घोषणांमुळे नवउद्योजकांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. स्टार्टअप क्षेत्रासाठी ते सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.

तन्मय रत्नपारखी, संस्थापक, ‘हॅंडशेक ग्लोबल’ स्टार्टअप ः स्टार्टअप्सच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प खूप सकारात्मक आहे. प्रत्यक्षात मोठ्या घोषणा झाल्या नसल्या तरी ‘डिजिटल इकॉनॉमी’ला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे स्टार्टअप्ससाठी अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तीन वर्षे प्राप्तिकर सवलत घेण्याची मुदत पाचवरून सात वर्षांपर्यंत वाढविल्यामुळे अनेक स्टार्टअप्स त्याचा लाभ घेऊ शकतील.

भरत लिमये, सहसंस्थापक, स्नॅपकिराणा ः कर सवलत घेण्याच्या कालावधीची मर्यादा सात वर्षांपर्यंत वाढविण्याच्या निर्णयाची प्रतीक्षा आज संपली. त्यामुळे अनेक नवउद्योजकांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल; तसेच किमान पर्यायी कर (मिनिमम अल्टरनेट टॅक्‍स- मॅट) काढून टाकण्यात आला नसला तरी त्याची मुदत दहावरून पंधरा वर्षांपर्यंत वाढविली आहे. म्हणजे मॅट भरण्यासाठी पात्र ठरणाऱ्या कंपन्यांना अतिरिक्त पाच वर्षे मिळणार आहेत; तसेच व्यवसायामध्ये आर्थिक वर्षभरात झालेल्या नुकसानीचा ताळमेळ (कॅरी फॉरवर्ड ऑफ लॉस) घालण्यासाठी अट शिथिल केली आहे. या सर्व सवलतींचा फायदा स्टार्टअप्सला होईल.

डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ः कौशल्य विकास केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु शिक्षणाच्या बरोबरीने कौशल्य शिक्षण द्यायला हवे. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी वेगळी यंत्रणा, हीदेखील चांगली घोषणा आहे. मात्र, परीक्षांची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी स्वातंत्र्य मिळायला हवे.  

डॉ. अरुण अडसूळ, माजी सदस्य, लोकसेवा आयोग ः कोणत्याही राष्ट्राच्या धोरणात्मक विकासात शिक्षण व्यवस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते, हे वास्तव नजरेसमोर ठेवून या अर्थसंकल्पात शिक्षणावर विशेष, सूचक आणि प्राप्त परिस्थितीत, व्यावहारिक लक्ष केंद्रित केल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. माध्यमिक शिक्षणात कल्पक आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी केलेल्या आर्थिक तरतुदी शिक्षणाचा हेतू आणि उद्देश पूर्ततेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. उच्च शिक्षणात दर्जेदार महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याची संकल्पना नक्कीच स्तुत्य आहे, त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व घटकांना गुणवत्ता सिद्ध करण्याची एक उत्तम संधी मिळणार आहे. विनाअनुदानित शिक्षणावर टाळलेले भाष्य आणि संशोधनाकडे केलेले दुर्लक्ष या बाबी मात्र चांगल्याच खटकल्या.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) ः या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत संरक्षण खात्यावरील खर्च वाढविला आहे. गेल्या अर्थसंकल्पात दोन लाख ५८ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यात यंदा दोन लाख ७४ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आहे. निवृत्तिवेतनाच्या व्यतिरिक्त ही तरतूद असल्याचेही त्यात ठळकपणे नमूद केले आहे. लहान आण मध्यम उद्योगांमधील कर्मचाऱ्यांमध्ये कौशल्य असते. तसेच, कौशल्य विकासाची केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. या दोन्हीचा वापर करून संरक्षण क्षेत्र स्वयंपूर्णतेकडे आणण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरतो. युद्धसामग्रीमध्ये स्वदेशी तंत्रज्ञान वापरण्यासाठी ‘मेक इन इंडिया’चे स्वीकारलेले धोरण या अर्थसंकल्पात पुढे घेऊन गेलेले दिसते. संरक्षण खात्याच्या दृष्टीने सकारात्मक अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. या अर्थसंकल्पात केलेल्या पायाभूत सुविधांचा विस्ताराच्या योजना, सायबर सुरक्षा, लहान व मध्यम उद्योग समूहांना बळकट करण्याच्या विविध तरतुदींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा संरक्षण खात्याला होणार आहे. त्यामुळे संरक्षण खात्याच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प स्वागतार्ह आहे. रस्त्यांचा विकास केल्याने त्याचा फायदा गतिमान हालचालींसाठी होतो. तसेच, सायबर सुरक्षेचे धोरण लष्करासाठीही उपयुक्त आहे.

Web Title: positive budget