भटक्‍यांच्या मुलांना "सावित्री'चा आधार 

ब्रिजमोहन पाटील - सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 30 September 2020

वस्तीवर चालविल्या जाणाऱ्या "सावित्री'च्या शाळेमुळे या दोघी बहिणी गणित सोडवत आहेत. इंग्रजी वाचण्या-बोलण्यासाठी धडपडत आहेत. शिवाय घरी गेले की शाळेत शिकलेल्या कविता म्हणत बागडत आहेत.

पुणे - इंदू कांबळे या फुलेनगर येथील झोपडपट्टीमध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहात आहेत. त्यांच्या पतीचे निधन झाले असून, अंजू व मंजू या जुळ्या मुलींचे शिक्षण थांबले होते. मात्र, वस्तीवर चालविल्या जाणाऱ्या "सावित्री'च्या शाळेमुळे या दोघी बहिणी गणित सोडवत आहेत. इंग्रजी वाचण्या-बोलण्यासाठी धडपडत आहेत. शिवाय घरी गेले की शाळेत शिकलेल्या कविता म्हणत बागडत आहेत. अशाच प्रकारे भटक्‍या विमुक्तांच्या वस्तीत 200 मुले- मुलांनी शिक्षणाची कास धरल्याने अशिक्षित पालकही सुखावले आहेत. 

निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था ही भटक्‍या विमुक्त जमातीतील समाज कार्याचे शिक्षण घेतलेल्या युवक-युवतीच्या पुढाकाराने सुरू झाली आहे. गेल्या 10 वर्षांपासून पुणे शहरासह जिल्ह्यात भटके विमुक्त, वंचितांचे शिक्षण, आरोग्य, रोजगार यावर काम करत आहे. आनंददायी कृती युक्त शिक्षण देऊन शिक्षणाची गोडी निर्माण करून, भटक्‍या विमुक्त जमातीतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जात आहे. कोरोनामुळे या विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद झाले होते, खासगी शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण दिले जात असले तरी या भटक्‍या विमुक्तांच्या मुलांना ते मिळणे अशक्‍यच होते. त्यामुळे "निर्माण'ने कोरोनाची योग्य खबरदारी घेऊन, भीमनगर, वडारवाडी आणि फुले नगर येथील वस्तीमध्ये सहा "सावित्री' शाळा सुरू केल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अभ्यासासह स्वच्छतेलाही महत्त्व 
वस्तीपातळीवर "सावित्री' शाळेत मुलांना कोरोनापासून संरक्षण कसे करावे याचे धडे दिले जात आहेत. त्यामध्ये हात धुणे, सॅनिटाझर वापरणे, मास्क लावणे, सोशल डिस्टन्स ठेवणे हे समजावून सांगितले जाते. शाळेत सॅनिटायझर व मास्कही दिले जातात. तीन ते दहा वयोगटापर्यंत मुलांना शैक्षणिक साधन साहित्य, खेळ, बालगीत यांच्या साह्याने शिकवले जाते. तर तिसरीच्या पुढील मुलामुलींना पाठ्यपुस्तकाच्या आधारे शिकवत गृहपाठही दिला जातो. यासोबत शासनाच्या मदतीने येथील मुलांना पोषण आहार दिला जातो. तसेच लसीकरण केले जाते. या तिन्ही वस्तीवर सहा सावित्रीच्या शाळा सुरू असून, सुमारे 200 मुले मुली शिकत आहेत. इंदापूर येथील 10 प्रकल्पांमध्ये 400 पेक्षा जास्त जण आहेत, असे निर्माणच्या संचालिका वैशाली भांडवलकर यांनी सांगितले. 

रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या सुनीता पवार म्हणाल्या, ""माझा मुलगा रोहित शाळेत सातवीला शिकतो पण यंदा लॉकडाउनमुळे शाळा बंद झाली. ऑनलाइन शिक्षणाची सोय नाही, त्यामुळे तो घरीच होता. पण निर्माणच्या सावित्रीच्या शाळेत तो जात असल्याने मला आनंद आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

""मला चार मुले आहेत. त्यापैकी करण हा बालवाडीत आहे तर रेणुका दुसरीत आहे. दोघेही रोज आनंदाने शाळेत जात आहेत. रेणुका डान्स चांगला करते, एबीसीडी ही व्यवस्थित म्हणते.'' 
आशा जाधव, पालक, फुलेनगर 

हेही वाचा : प्रयोगशील शेतकरी सोपान शिंदे यांना रेशीम शेतीने दिली आर्थिक साथ

मुलांचे भीक मागणे बंद 
भटक्‍या विमुक्तांचे रोजगार व तेथील वातावरण यामुळे मुलांच्या विकासाकडे पालकांचे लक्ष नव्हते, अनेकांनी शाळा सोडून दिली होती. जेवणाचा प्रश्‍न असल्याने अनेकजण भीक मागत होते. पण निर्माणने पालकांशी संवाद साधून व एकात्मिक महिला व बाल विकास विभागाशी समन्वय साधून "सावित्री'च्या शाळेत खाऊ वाटप सुरू केले. त्यामुळे अनेक मुलांचे भीक मागणे बंद झाले आहे. वस्तीतील 85 टक्के मुले शाळेत जात आहेत, त्यांना अभ्यासासाठी गोडी लागली, असे भांडवलकर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Positive news Schools built by Nirman Sanstha