लेण्याद्रीचे प्रवेश शुल्क रद्द करण्याबाबत सकारात्मक अहवाल : खासदार आढळराव पाटील

junnar.
junnar.

जुन्नर - लेण्याद्री ता.जुन्नर येथील अष्टविनायक गणेश मंदिराकडे जाणारे भाविक व अन्य लेण्यांकडे जाणारे पर्यटक यातील फरक ओळखता येणे शक्य होत नाही, तसेच कर आकारणीसाठी स्वतंत्र मार्ग तयार करणे शक्य नाही यामुळे येथील प्रवेश शुल्क रद्द करण्याबाबत पुर्नविचार व्हावा असा स्पष्ट अहवाल भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालकाकडे अधीक्षक बिपीन चंद्रा यांनी पाठविला असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. 

लेण्याद्री येथे अष्टविनायक श्री गणेशाचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून सरसकट प्रवेश शुल्क आकारणी केली जाते. भाविकांना विनाशुल्क गणपतीचे दर्शन घेता यावे यासाठी आढळराव पाटील यांचा पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व पत्रव्यवहाराने अधीक्षक बिपीन चंद्रा यांनी महासंचालकांना शुल्क माफीसाठी सकारात्मक अहवाल दिला आहे. 
जुन्नर तालुक्यातील लेण्यांतील मंदिरे व शिलालेख यांना दि. २६ मे १९०९ मध्ये राजपत्र अधिसूचना क्र. २७०४ ए नुसार केंद्रीय संरक्षित स्मारकांचा दर्जा देण्यात आला आहे. येथील २२० लेण्या भारतातील सर्वात मोठ्या लेण्यांचा समूह आहे. लेखक जेम्स फर्ग्युसन व जेम्स बर्गेस यांच्या भारतीय लेण्यांमधील मंदिरे या पुस्तकामध्ये गणपती हे येथील लोकांचे आराध्य दैवत असून लोक यात्रा उत्सवांमध्ये दूरवरून दर्शनासाठी येतात असा उल्लेख आहे. लेण्यांची मालिका ही चार वेगवेगळ्या टेकड्यांवर सहा समूहांमध्ये आढळते, ज्याला तुळजा, अंबा-अंबिका, शिवनेरी व गणेश लेणी या नावाने ओळखले जाते. या सर्व लेण्यांच्या समूहाला लेण्याद्री हे नाव दिले आहे. सात नंबरची लेणी ही सर्वात मोठी लेणी असून मराठ्यांच्या साम्राज्यावेळी उपासनेकरिता येथे गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. सद्यस्थितीत हे अष्टविनायकातील प्रमुख एक तीर्थक्षेत्र असून लाखो लोक दर्शनासाठी येतात. 

सन १९९६ मध्ये भारतीय पुरातत्व विभागाने लेण्याद्रीच्या पायथ्याशी प्रवेश शुल्कासाठी तिकीट खिडकी सुरु केली. हे शुल्क सर्व लेण्यांचे एकत्रित पर्यटन शुल्क म्हणून ठेवले होते. येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये बहुतेक लोक हे भाविकच असल्याने केवळ दर्शनासाठी हे शुल्क आकारले जात आहे असा सर्वांचा गैरसमज झाला आहे. गणेश लेणी-मंदिराकडे स्वतंत्र मार्गाने जाण्यासाठी कठडे बसविण्यास जागा नाही. तसेच मंदिर व लेणीकडे जाण्यासाठी असणाऱ्या एकाच रस्त्यामध्ये दोन स्वतंत्र मार्ग करता येणे शक्य नाही. याठिकाणी येणाऱ्या व्यक्तींमध्ये भाविक व पर्यटक असा फरक शोधणे कठीण काम असल्याने लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण मागणीचा विचार करून येथील प्रवेश शुल्क माफ करण्यासाठी पुर्ननिर्णय घ्यावा असा अहवाल बिपीन चंद्रा यांनी पाठविला असल्याचे आढळराव यांनी सांगितले. 

आढळराव म्हणाले, शुल्क माफी बाबत नवी दिल्ली येथील भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालकांकडे पाठविण्यात आलेल्या सकारात्मक अहवालामुळे गेली आठ ते दहा वर्षांपासूनच्या आपल्या प्रयत्नांना यश मिळेल अशी आशा आहे. तसे झाल्यास अष्टविनायकापैकी प्रमुख एका गिरिजात्मकाचे दर्शन घेण्यासाठी दररोज दूरवरून येणाऱ्या हजारो भाविकांना प्रवेश शुल्क भरण्याची आवश्यकता राहणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com