'पीएमपीएमएल'-रिक्षांना आवरा; वाहतूक कोंडी टाळा!

फारूख शेख
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

दररोज सकाळ-संध्याकाळ ऑफिसला जाण्या-येण्यासाठी पुण्याच्या प्रमुख रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या अनेक पुणेकरांपैकी मी एक! नवनवीन उड्डाणपूल तयार करून आणि अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण करून व वाहतुकीत बदल करूनही पुण्यातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. पुण्यातील दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या व दुचाकी-चारचाकी वाहनांच्या संख्येत होत असलेली वाढ ही समस्या अधिकच जटील बनवित आहेत. या उग्र होत चाललेल्या समस्येवर मात करण्यासाठी दररोजच्या वाहतूक कोंडीत तासनतास अडकल्यावर सुचलेले काही उपाय मी सुचवू इच्छितो..

दररोज सकाळ-संध्याकाळ ऑफिसला जाण्या-येण्यासाठी पुण्याच्या प्रमुख रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या अनेक पुणेकरांपैकी मी एक! नवनवीन उड्डाणपूल तयार करून आणि अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण करून व वाहतुकीत बदल करूनही पुण्यातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. पुण्यातील दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या व दुचाकी-चारचाकी वाहनांच्या संख्येत होत असलेली वाढ ही समस्या अधिकच जटील बनवित आहेत. या उग्र होत चाललेल्या समस्येवर मात करण्यासाठी दररोजच्या वाहतूक कोंडीत तासनतास अडकल्यावर सुचलेले काही उपाय मी सुचवू इच्छितो..

माझ्या मते, पुण्यातील या वाहतूक कोंडीला सर्वांत जास्त कारणीभूत असलेले घटक : 'पीएमपीएमएल', रिक्षा, दुचाकीवरील तरुणाई आणि वाहतूक नियम न पाळण्याची मानसिकता!

पीएमपीएमएल बस : पुण्याच्या रस्त्यांवरून धावणाऱ्या 'पीएमपीएमएल'च्या बसचा या वाहतूक कोंडीमध्ये सिंहाचा वाटा आहे. कोणत्याही डेपोमधून निघणाऱ्या या बसच्या वेळांमध्ये कोणतीही शिस्त नाही. मुख्यत:, सकाळी डेपोतून निघणाऱ्या बस या एकामागोमाग पाच-सहांच्या कळपाने निघतात. त्यामुळे त्यांचा मार्ग वेगवेगळा होईपर्यंत या बस त्या मार्गावर कोंडी करत जातात. हे चित्र मी बिबवेवाडी, सातारा रस्ता, मंडई, मंगला टॉकिजसमोर, कर्वे रस्ता, लालबहादूर शास्त्री रस्त्यांवर सर्रास पाहतो.

'पीएमपीएमएल'ची बस त्यांच्या थांब्यासमोर न उभी राहता बहुतांश वेळा रस्त्यावरच थांबवतात. बसमधील प्रवासी उतरत किंवा चढत नाहीत, तोपर्यंत या बसच्या मागील वाहतूक एकतर तुंबते किंवा मंद होते. बसच्या मागे असलेले दुचाकीस्वार हवी तशी वाट काढत पुढे जायचा प्रयत्न करतात आणि इतर सगळी वाहतूक विस्कळीत होते. माझ्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर 'पीएमपीएमएल'ची एकही बस बंद पडलेली नाही, असा अनुभव क्वचितच येतो. अशा बंद पडलेल्या बसमुळेही अर्थातच समस्या उद्भवते.

रिक्षा : पुण्यातील रस्त्यांवर सर्वांत जास्त मोकाटपणे कुणी फिरत असेल, तर ते म्हणजे रिक्षावाले. रस्त्यावर कुठेही प्रवाशांना घेण्यासाठी-उतरवण्यासाठी अचानक रिक्षा थांबली, की मागून येणाऱ्या वाहनांना कसरत करावीच लागते. सिग्नल न देता रस्त्यावर रिक्षाने दिशा बदलली, की मागील वाहतूक विस्कळीत झालीच! प्रवासी वाहतूक करणाऱ्या व ओरडून प्रवासी बोलावणाऱ्या या रिक्षा माझ्या मते सर्वांत जास्त बेशिस्त, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आहेत. अनेकदा चौकात रिक्षा थांबवून प्रवासी भरताना होणारी वाहतूक कोंडी काही वेळा पोलिसांच्यासमोरच होत असते. पण त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही.

दुचाकीस्वार : पुण्याच्या वाहतुकीच्या समस्येत सिंहाचा वाटा उचलणारा आणखी एक घटक म्हणजे पुण्यातील दुचाकीस्वार तरुणाई. 'सायकलींचे शहर' ही जुनी ओळख पुसून 'दुचाकींचे शहर' म्हणून नावलौकिक मिळविलेल्या पुण्याच्या रस्त्यांवर प्रत्येक सणांच्या मुहूर्तावर हजारो नवीन दुचाकी वाहनांची भर पडते. ही तरुणाई दुचाकी दोन वाहनांमधून वाट काढत, चारचाकी गाड्यांना 'कट' मारत, वेगात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवतात.

चौकात सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहत थांबलेला दुचाकीस्वार हे चित्र आता दुर्मिळ होत आहे. एकतर थांबलेल्या दोन गाड्यांमधून वाकडी-तिकडी वाट काढत दुचाकीस्वार पुढे येतो. झेब्रा क्रॉसिंगच्याही पुढे जाऊन उभा राहतो. एका बाजूचा सिग्नल बंद होऊन दुसऱ्या बाजूचा सिग्नल चालू होण्यापूर्वी सुसाट वेगाने निघूनही जातो. इतरांसारखे पोलिसही फक्त बघ्याची भूमिका घेतात. दुचाकीस्वारांची ही अशी वृत्ती वाहतुकीचा ताल बिघडविणारी आहे.

वाहतुकीच्या कोंडीवरील संभाव्य उपाय :
1. डेपोमधून निघणाऱ्या 'पीएमपीएमएल' बसचे योग्य असे वेळ आणि मार्गानुसार नियोजन केल्याने एकगठ्ठा बसमुळे होणारी कोंडी कमी होईल.

2. वाहतुकीचे नियम मोडल्यावर पीएमपीएमएलच्या चालकांनाही तितक्‍याच कडक शिक्षेची तरतूद असावी आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना द्यावे.

3. बस चालकांसाठी दर तीन महिन्यांनी वाहतुकीच्या नियमांवर आधारित प्रशिक्षणाचा कार्यक्रम घ्यावा.

4. बसस्टॉपवर बस थांबविण्याची जागा ही ठळक पांढऱ्या रंगाने आखून द्यावी. बस त्यातच उभी करावी, याची शिस्त चालकांना लावावी.

5. बसस्टॉपवर प्रवाशांना रांगेची शिस्त लावावी.

6. बंद पडलेली बस मुख्य रस्त्यावरून बाजूला घेऊन वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता कंडक्‍टर-ड्रायव्हरवर सोपवावी. त्यासाठी वेळेचे बंधनही त्यांच्यावर घालावे.

7. रिक्षा वाहतूक व रिक्षा चालकांवर नियंत्रणाची जबाबदारी वेगळ्या वाहतूक पोलिसांवर द्यावी. जेणेकरून या पोलिसांवर इतर कामाचा ताण येणार नाही.

8. रिक्षाचे थांबे बसस्टॉप जवळ नको. चौकापासून बस स्टॉप आणि रिक्षा थांबे हे कमीतकमी 300 मीटर लांब असावे.

9. सीसीटीव्ही यंत्रणा अधिक वेगवान, कार्यक्षम व ठळक करून त्याद्वारे दुचाकीस्वारांवर नियंत्रण ठेवावे. फक्त नियम तोडणाऱ्यांवर कारवाई न करता वेग हा मुद्दाही नियमात आणावा.

10. वाहतूक पोलिसांची ड्युटी ही फक्त चौकात नसावी. रस्त्यांवरही पोलिस ठेवले, तर वाहने वेडीवाकडी चालवणाऱ्यांवर नक्की जरब बसेल, तसेच वाहतूक कोंडी झालीच तर ती पटक सुरळीतही होईल.

11. प्रत्येक चौकातील सिग्नलची वीजयंत्रणा सौरउर्जेवर नियंत्रित करावी. त्यामुळे सिग्नल बंद असल्याने होणारी कोंडी टाळता येईल.

12. एखाद्या चौकात काही कारणाने वाहतूक कोंडी झाली असेल, तर त्याची सूचना दोन चौक आधीच मिळेल यासाठी इलेक्‍ट्रॉनिक डिजिटल बोर्डाची व्यवस्था करावी. जेणेकरून इतर वाहनचालक पर्यायी रस्त्यांचा वापर करून स्वत:चा वेळ वाचवू शकतील आणि आधीच झालेल्या कोंडीमध्ये भरही पडणार नाही. अशी यंत्रणा सौरउर्जेवर उभारणे शक्‍य होईल. सिंगापूरमध्ये अशी यंत्रणा प्रभावीरित्या राबविण्यात येत आहे.

13. वाहतुकीचे नियम पाळण्याची वृत्ती आणि त्याचे संस्कार शालेय जीवनापासूनच मुलांच्या मनावर बिंबविण्यात यावे. यासाठी त्यांच्या शारिरिक शिक्षणाच्या तासामध्येच त्याचा अंतर्भाव करावा. अधूनमधून वाहतूक पोलिस व अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन मुलांशी संवाद साधावा. हा उपक्रम नित्यनेमाने आणि ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा राबविण्यात यावा.

14. अनेक कंपन्यांना 'सीएसआर'अंतर्गत समाजोपयोगी सेवा करणे बंधनकारक असते. त्याप्रमाणे त्यांच्या त्याबद्दलच्या वार्षिक कार्यक्रमात वाहतूक सुरळीत होण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांवरील चौकांत वाहतूक पोलिसांना मदत होईल, असे उपक्रम करण्याचे आवाहन करावे.

Web Title: Possible solutions for Pune Traffic Jam