अपुऱ्या जागेत टपाल कार्यालय

Post-Office
Post-Office

औंध - बाणेर, बालेवाडी या महानगरपालिकेतील उपनगरांसह महाळुंगे गावासाठी बालेवाडी येथील नॅशनल इन्शुरन्स ॲकॅडमी (एनआयए)च्या आवारातील केवळ एकच टपाल कार्यालय कार्यरत आहे. अपुऱ्या जागेत चालणाऱ्या या कार्यालयात कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी बाणेर किंवा बालेवाडी भागात आणखी एक टपाल कार्यालय होणे गरजेचे असल्याचे मत येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.

शहरासह उपनगरांची झपाट्याने होत असलेली वाढ व या भागातील टपाल कार्यालयात येणाऱ्या पत्रांची संख्या पाहता बटवडा करणे, पत्रांची वर्गवारी करणे आणि संकलन करणे यासाठी आवश्‍यक ती जागा येथे उपलब्ध नाही. तरीही अशा परिस्थितीतही येथील कर्मचारी काम करत आहेत. पावसाळ्यात तर पत्रांची वर्गवारी करण्यासाठी जागाच नसल्याने कधी कधी बाहेरच्या व्हरांड्यात भीजतच पत्रांची वर्गवारी करावी लागते. या भागातील नागरिकांचे आधार कार्ड, पासपोर्ट किंवा बॅंक, पतसंस्था आणि इतर सरकारी पत्रे यांची संख्या मोठी असून वर्गीकरणासाठी पुरेशी जागा नसल्याने कर्मचारीही मिळेल त्या जागेत काम करत असतात. 

तशातच या टपाल कार्यालयात नागरिकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कर्मचाऱ्यांना काम करण्यास जागा अपुरी पडते. टपाल कार्यालयाचे कामकाज चालविण्यासाठी राष्ट्रीय विमा ॲकॅडमीची (एनआयए) भाडेतत्त्वावर घेतलेली ही जागा जवळपास अडीचशे चौरस फूट एवढीच आहे.

परंतु प्रत्यक्षात कामाजासाठी दीड हजार चौरस फूट एवढी जागा आवश्‍यक आहे. एवढ्या अपुऱ्या जागेत कामकाज करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सहायक पोस्ट मास्तर किशोर घुले यांनी या वेळी सांगितले. जागेचा प्रश्न असल्याने नवीन टपाल कार्यालयासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवला असून, त्यास मंजुरीही मिळाली आहे. मात्र अजून आवश्‍यक अशी जागा न मिळाल्याने शोध सुरू असल्याचेही घुले यांनी सांगितले. 

सध्या बालेवाडी कार्यालयात बारा पोस्टमन, चार कारकून आणि एक सहायक पोस्टमास्तर एवढे मनुष्यबळ आहे. परंतु सर्वांना काम करण्याएवढी जागा नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कामाचा ताण पाहता  नवीन प्रस्तावित टपाल कार्यालय बाणेर रस्त्यावर सुरू करण्याचे नियोजित असून, या ठिकाणी आणखी नऊ पोस्टमन, तीन कारकून आणि एक सहायक पोस्टमास्तर एवढे मनुष्यबळ असणार आहे. 

बाणेर भागातील जागेचे गगनाला भिडलेले भाव पाहता या भागात अजून तरी टपाल विभागाला आपले नवीन सुसज्ज कार्यालय उभारता आलेले नाही. महापालिकेच्या मालकीची एखादी जागा टपाल कार्यालयासाठी मिळण्यासाठी तसा प्रस्तावही स्मार्टसिटी प्रशासन आणि पालिकेकडे पाठवला आहे. 

यासंदर्भात पालिकेच्या काही जागांची पाहणी केल्याचेही सहायक पोस्टमास्तर घुले यांनी सांगितले. तरी बाणेर, बालेवाडीवासीयांच्या सेवेसाठी नवीन व सुसज्ज टपाल कार्यालय लवकरात लवकर बाणेर भागातच व्हावे यासाठी केला जाणारा पाठपुरावा यशस्वी होत असून, येत्या काळात नवीन टपाल कार्यालय उभारण्यात येईल ही अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.

आम्ही नवीन टपाल कार्यालयासाठी प्रस्ताव पाठवला असून, त्यास मंजुरीही मिळाली आहे. परंतु बाणेर रस्त्यावरील महागड्या जागा भाड्याने घेण्यात अडचणी येत आहेत. यासाठी पालिकेकडे जागा मिळण्यासंदर्भात पत्र देऊन मागणीही करण्यात आली आहे. तसेच काही जागांची पाहणीही केली आहे. योग्य जागा मिळत नाही तोपर्यंत नवीन कार्यालय सुरू करण्यात अडचणी येत असून, जागा मिळताच हा प्रश्न मार्गी लागेल आणि नवीन सुसज्ज कार्यालय उभारले जाईल. यासाठी वरिष्ठांनीही पाहणी केली असून, त्यांच्या सहकार्याने प्रक्रिया सुरू आहे.
- किशोर घुले, सहायक पोस्ट मास्तर, बालेवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com