टपाल कार्यालयामध्ये आजपासून नोटा घेणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

पुणे - बचत खात्यांमध्ये ग्राहकांना पाचशे व हजार रुपयांच्या नोटा भरता याव्यात, तसेच चार हजारापर्यंतच्या नोटा बदलून मिळाव्यात, यासाठी टपाल विभागातर्फे सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील सर्वच कार्यालयांत ही सुविधा उद्यापासून (गुरुवारी) उपलब्ध करून देण्यात येणार असून, ज्येष्ठ नागरीक व सरकारी कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष (काऊंटर) उघडण्यात येईल, असे पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्‍वरकर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या आदेशामुळे बुधवारी टपाल कार्यालयांतील व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने एकही आर्थिक व्यवहार झाला नाही. 

  टपाल कार्यालयांतील नव्वद टक्के आर्थिक व्यवहार हे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांमध्ये होतात. दररोजच्या आर्थिक व्यवहारांकरिता बॅंकेकडून आवश्‍यक तेवढी रक्कम खात्यात जमा करण्यात येते. टपाल खात्याच्या विविध योजना तसेच बचत खाते, आवर्ती ठेव खाते व अन्य खात्यांमध्ये लाखो ग्राहकांनी गुंतवणूक केली आहे. ग्राहक त्यांचे पैसे या बचत खात्यांमध्ये भरू शकतात. पुणे शहरात लहान-मोठी अशी साधारणतः 115 कार्यालये आहेत. 

दरम्यान, ग्राहकांच्या सोईकरिता बुधवारी पुणे शहर पश्‍चिम, पूर्व आणि ग्रामीण या तीन विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात ग्राहकांना अधिकाधिक सेवासुविधा पुरविण्याबाबत चर्चा झाली. केंद्र शासनाच्या आदेशानुसार आवश्‍यक ती कार्यवाहीदेखील करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र नव्याने खाते उघडण्याबाबत केंद्राकडे स्पष्टीकरण मागितले असून, केंद्राच्या उत्तरानंतर त्याबाबत स्पष्टता होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. एकावेळीस टपाल कार्यालयातून दहा हजार व आठवडाभरात वीस हजार रूपये काढता येतील, असेही त्यांनी नमूद केली. 

नागरिकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये. वेळेवर पैसे उपलब्ध करून त्यांचे वितरण करणे हे आमच्यासमोरील आव्हान आहे. टपाल खात्याच्या योजनांतर्गत ज्या ग्राहकांची खाती आहेत, ते त्यांच्या खात्यामध्ये पैसै भरू शकतात आणि भविष्यात त्यांच्या सोयीनुसार केव्हाही काढू शकतात. सुरवातीला चार हजार रुपयांपर्यंत नोटा बदलून दिल्या जातील. उद्यापासून नवीन खाती उघडण्याचीदेखील सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. त्यासाठी "केवायसी' आवश्‍यक आहे. 
गणेश सावळेश्‍वरकर, पोस्ट मास्तर जनरल.

Web Title: Post office take notes today