LokSabha 2019 : बारणेंची 5 वर्षे राष्ट्रवादीची धुणीभांडी करण्यातच; वाटली पत्रके (व्हिडिओ)

Shrirang Barne
Shrirang Barne

पुणे : मावळसाठी आज (मंगळवार) पालकमंत्री गिरीश बापट आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पार पडत असलेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वाटलेल्या पत्रकावरून राजकारण सुरु झाले आहे. हे पत्र फाडलेल्या अवस्थेत सापडले असून, यामध्ये श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देऊ नये असे स्पष्ट आहे. 

शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याशी असणारे शीतयुद्ध जगतापांनी यानिमित्ताने उघडपणे दाखवून दिले आहे. त्यानंतर हा पत्रकाचा प्रकार घडला असून, पत्रकार परिषदेत वाटलेली पत्रके गोळा करतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. 

युतीच्या पत्रकार परिषदेत वाटण्यात आलेल्या पत्रकात लिहिले आहे...
श्रीरंगाचे हात दाखवून अवलक्षण...
2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा मागच्या वेळेस बेडकाचा बैल दाखवून भोकाडी दाखवण्याचा कार्यक्रम चांगलाच यशस्वी झाला खरा... पण त्यानंतर 5 वर्षे या गड्याने संसदरत्न नावाखाली झोपूनच काढली. प्रत्यक्ष मतदार संघातील यक्ष प्रश्नाबाबत कुठलेच ठोस निर्णय महाशयांना घेता आले नाही. कायम मतलबाचे राजकारण करणाऱ्या बारणेंनी ज्या कलाटेंनी त्यांच्या उमेदवारी आणि विजयासाठी जीवाचे रान केले, त्याचाच पहिला तळी भंडार करण्याचा प्रयत्न केला.

विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत चक्क त्याच्या विरोधात उघड प्रचार केला. मनपाच्या निवडणुकीत स्वतः त्यांच्या वॉर्डात राष्ट्रवादीशी भ्रष्ट युती केली. त्यामुळे स्वतःच्या गावातला पॅनलही ते निवडून आणू शकले नाहीत. पडे तो भी टांग उपर या म्हणीप्रमाणे होऊ घातलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या नटरंगाणे उद्धव साहेबांचा कोणताही अधिकृत निरोप नसताना, पक्षाच्या सर्व्हेत पूर्ण निगेटिव्ह रिपोर्ट असताना... त्याची कारणे ही तशीच आहेत. कारण खासदार झाल्यावर शिवसैनिकांची कमी आणि राष्ट्रवादी वाल्यांची धुणीभांडी धुण्यात या महाशयांनी पाच वर्षे घालवली. असे असताना कायम शिवबंधन असलेला सच्चा शिवसैनिक असल्याचा कायम खोटा आव आणला. याच बोगस वागण्यातून काल सोनई मंगल कार्यलयात स्वतःला अधिकृत स्वयंघोषित खासदारकीचा उमेदवार म्हणणाऱ्या बारणेच सभेला फक्त 250 कार्यकर्ते उपस्थित होते.

पाच वर्षे स्वपक्षीयांकडे दुर्लक्ष आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीसोबत चाललेली मॅचफिक्सिंग मात्र जनतेच्या लक्षात आली आहे. कारण लोकसभेत पराभूत होऊन विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर चिंचवड विधानसभा लढण्याचा शब्द राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्टींकडून घेऊन बसला आहे.  उद्धवजी...  फडणवीस साहेबांना माझी पोट तिडकीने विनंती आहे, की वाघाचे कातडे घालून कुणी वाघ होत नाही. माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान पदी पुन्हा एकदा विराजमान होण्यासाठी एकेक सीट महत्वाचे असताना अशा खंडोजी खोपडेंना तिकीट जाऊन युतीचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे. युतीचा खंदा समर्थक आणि मोदी साहेबांचा चाहता म्हणून हाताच्या कंकणाला आरसा कशाला म्हणून हा सर्व मागोवा आपण समोर ठेवत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com