वाळवणाच्या पदार्थांमुळे बटाटा तेजीत

वाळवणाच्या पदार्थांमुळे बटाटा तेजीत

मोशी - उन्हाळा आणि वाळवणाचे पदार्थ हे जणू समीकरणच. त्यामुळे उन्हाळा सुरू झाला की महिलांची वाळवणांसाठी लगबग सुरू होते. सध्या त्यासाठी पोषक वातावरणही आहे. त्यामुळे बहुतांश गृहिणींचा कल बटाट्यापासून उपवासाचे ‘होममेड’ वाळवण बनविण्याकडे आहे. त्यामुळे बटाट्याची मागणी वाढली असून, रविवारी (ता. ८) उपबाजारात आवक वाढून भाव तेजीत होते. क्विंटलला सतराशे ते अठराशे रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात तो प्रतिकिलो २५ रुपयांवर होता. गेल्या आठवड्यात हेच भाव १० ते १२ रुपये किलो होते.

मोशी येथील श्री नागेश्‍वर महाराज उपबाजारात रविवारी बटाट्याची तब्बल २४ टन आवक झाली. त्यातील वेफर्ससाठी आवश्‍यक असलेल्या मोठ्या आकाराच्या बटाट्याला मागणी होती. या बटाट्यापासून वेफर्स, उपवासाच्या चकल्या, कडबोळी, साबुदाणा-बटाटा पापड, वडे, कीस, चिप्स आदी पदार्थ बनविले जातात. 

घरातील सर्वांचा मनपसंत पदार्थ म्हणजे वेफर्स. तसेच बटाट्यापासून बनविलेले सर्वच पदार्थ आवडीने खाल्ले जातात. त्यामुळे ते मी घरीच बनविते. त्यासाठी बाजारातून एकावेळी पाच ते दहा किलो बटाटे खरेदी करते. 
- मंदाकिनी सूर्यवंशी, गृहिणी, मोशी

बटाट्यापासून उन्हाळी पदार्थ बनविण्यास महिलांनी सुरवात केली आहे. त्यामुळे मोठ्या बटाट्याला अधिक मागणी आहे. दररोज सुमारे २०० पोती बटाट्याची घाऊक विक्री होते. 
- दिनेश आल्हाट,  घाऊक व्यापारी, मोशी उपबाजार

अशी केली जाते तयारी
भल्या पहाटे बटाटे उकडले जातात. थंड झाल्यावर त्याची साल काढून कुस्करले जातात. आवश्‍यकतेनुसार भिजवलेला साबुदाणा व चवीनुसार मीठ, तिखट वापरले जाते. पदार्थ बनवून कडक उन्हात सुकवले जातात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com