पिंपरी शहरात  खड्डे ठरताहेत धोकादायक 

पिंपरी शहरात  खड्डे ठरताहेत धोकादायक 

पिंपरी - दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून, खडी पसरल्याने अनेक ठिकाणी रस्ते निसरडे झाले आहेत. खोलगट भागात पाणी साचल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. भूमिगत सांडपाणी वाहिन्यांचे काही चेंबर खचले असून, ते धोकादायक झाले आहेत. 

दीर्घ विश्रांतीनंतर पावसाचे गुरुवारी सायंकाळी जोरदार पुनरागमन झाले. तेव्हापासून रविवारी सायंकाळपर्यंत कधी संततधार, तर कधी जोरदार सरी कोसळत होत्या, त्यामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यातील खडी पसरल्याने दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहेत. इंद्रायणीनगर चौकात हा प्रकार गंभीर आहे. या ठिकाणी पाच रस्ते एकत्र मिळतात. शिवाय, रस्त्याच्या डांबरीकरणासाठी प्राथमिक थर टाकलेला होता. तो वाहून गेल्याने खडी वर आली आहे. अनेक ठिकाणी विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी चर खोदलेले होते, त्यातील खडीही वर आल्याने पुन्हा चर निर्माण होऊन धोकादायक झाले आहेत. काही ठिकाणच्या गतिरोधकांचे खडीकरण उखडल्याने ते धोकादायक झाले आहेत. 

येथे आहेत खड्डे 
- पुणे- मुंबई महामार्ग : दापोडी सिद्धार्थनगर, कासारवाडी, खराळवाडी, काळभोरनगर, निगडीतील टिळक चौक, भक्तिशक्ती चौक. 
- देहूरोड- कात्रज बाह्यवळण मार्ग : किवळेतील मुकाई चौक, सेवा रस्त्यावरील पुनावळे भुयारी मार्ग, ताथवडेतील पवार वस्ती भुयारी मार्ग, वाकडमधील भूमकर चौक व भुजबळ चौक भुयारी मार्ग. 
- देहू- आळंदी रस्ता : मोशीतील भारतमाता चौक, जाधववाडी परिसर, कुदळवाडी कॉर्नर, तळवडे आयटी पार्क कॉर्नर, विठ्ठलवाडी. 
- औंध- रावेत रस्ता : ड प्रभाग कार्यालय भुयारी मार्ग, जगताप डेअरी चौक कॉर्नर, वाकड फाटा- डांगे चौक, काळेवाडी फाटा परिसर. 
- निगडी- भोसरी स्पाइन रस्ता : संतनगर कॉर्नर, स्पाइन सिटी कॉर्नर, जाधववाडी चौक, घरकुल चौक, निगडी भक्तिशक्ती चौक, संग्रामनगर. 
- अन्य अंतर्गत रस्ते : वाल्हेकरवाडी- रावेत, आकुर्डी रेल्वे स्टेशन- रावेतमधील इस्कॉन मंदिर, पुनावळे- हिंजवडी, ताथवडे- हिंजवडी, चिंचवड स्टेशन- गंगानगर- आकुर्डी रेल्वे स्टेशन, किवळे- रावेत, रहाटणीतील कृष्णानगर, नाशिक महामार्गावरील राजे शिवछत्रपती चौक- वडमुखवाडी रस्ता, भोसरी- आळंदी रस्ता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com