कात्रज बाह्यवळण मार्ग खड्ड्यांनी खिळखिळा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

फुरसुंगी : रात्रंदिवस अवजड वाहतूक चालणाऱ्या कात्रज बाह्यवळण मार्गावर मंतरवाडी (उरुळी देवाची) ते हांडेवाडी हा रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी खिळखिळा झाला आहे. अपघात, आदळआपट, वाहतूक खोळंबा, उडणारी धूळ यामुळे येथील वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. 

फुरसुंगी : रात्रंदिवस अवजड वाहतूक चालणाऱ्या कात्रज बाह्यवळण मार्गावर मंतरवाडी (उरुळी देवाची) ते हांडेवाडी हा रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी खिळखिळा झाला आहे. अपघात, आदळआपट, वाहतूक खोळंबा, उडणारी धूळ यामुळे येथील वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. 

मंतरवाडी ते हांडेवाडी या बाह्यवळण मार्गावरून दिवसभर जड वाहतूक, पीएमपीएल बस, खासगी वाहने, मालवाहतूक करणारी वाहने, स्कूल बसची मोठी वाहतूक सुरू असते. सहजीवनवाडी ते हांडेवाडी या रस्त्याला अनेक दिवसांपासून विस्तीर्ण व खोल खड्डे पडले आहेत. यातील काही खड्डे आठ फूट बाय चार फूट असे मोठे असून, भरधाव छोट्या चारचाकी, तीनचाकी टेंपो व दुचाकीस्वार या खड्ड्यांत आदळून अक्षरशः उलटून जात आहेत.

पंधरा दिवसांत आठ ते दहा दुचाकीस्वार या खड्ड्यांत पडून गंभीर जखमी झाले आहेत. रात्रीच्या वेळी हे खड्डे दिसत नसल्याने जास्त अपघात होतात. खड्ड्यांशेजारीच मोठ्या प्रमाणात लहान खडी पसरल्याने दुचाकीस्वार घसरून पडत आहेत.

नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हा रस्ता दुरुस्त करत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत बांधकाम विभागाशी संपर्क केला असता पिसोळी, उंड्री व त्यापुढील हांडेवाडीपर्यंतचा रस्ता दुरुस्त केला आहे. येथे रुंदीकरण, दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. हांडेवाडी फाट्यावरून पुढे रस्त्याची कामे आता सुरू केली आहेत. सध्या खड्डे पडलेल्या रस्त्यांची दुरुस्तीही लवकरच केली जाईल, असे सांगण्यात आले. 

सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. खड्ड्यांमुळे होणारे अपघात, वाहतूक कोंडी याला अधिकारीच जबाबदार असून, त्यांच्यावरच कारवाई होणे गरजेचे आहे. 
- भगवान भाडळे, अध्यक्ष, कचरा डेपो हटाव संघर्ष समिती 

मी रोज कामानिमित्त येथून मंतरवाडीला जातो. आतापर्यंत दोन वेळा या खड्ड्यांत दुचाकीसह घसरून पडून जखमी झालो आहे. दवाखान्यात पंचवीस ते तीस हजार खर्च झाला. पंधरा दिवस कामाचा खाडा झाला. हे नुकसान बांधकाम विभागाचे अधिकारी भरून देणार आहेत का? 
- सोमनाथ पवार, नागरिक

Web Title: Potholes in Katraj Highway making driving miserable