कमी दाबाचा पिकांना शॉक

जनार्दन दांडगे
बुधवार, 18 एप्रिल 2018

उरुळी कांचन - पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, सोरतापवाडी, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, तरडे, वळती, शिंदवणे, आळंदी म्हातोबाची या प्रमुख गावांसह दौंड तालुक्‍यातील डाळिंब परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे. दोन्ही कालव्यांतील पाणी उशाला असूनही केवळ कमी दाबाच्या विजेमुळे वीजपंप चालत नसल्याने भाजीपाला, फूलशेती तसेच ऊस यांसारखी पिके कोमजून जाऊ लागली आहेत. खंडित आणि कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे पूर्व हवेलीतील वीस हजारांहून अधिक शेतकरी अडचणीत आहेत.

पूर्व हवेलीतील वरील सर्व गावांना थेऊर (ता. हवेली) येथील केंद्रासह वळती फीडरच्या मदतीने शेती व घरगुती वापरासाठी वीजपुरवठा केला जातो. गेल्या सहा महिन्यांपासून वळती फीडरमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरगुती वापर, शेती व उद्योगासाठी विजेची मागणी दीडपट वाढली आहे. वळती फीडर उभारताना, त्यावरून तीनशे ॲम्पियरच्या आसपास  दाबाच्या विजेची मागणी होती. मात्र गेल्या सुमारे वीस वर्षांत कृषी, घरगुती व उद्योगासाठी लागणाऱ्या विजेची मागणी पाचशे ॲम्पियरपर्यंत पोचली आहे. क्षमतेपेक्षा वीजपुरवठा पाढल्याने वळती फीडरमध्ये सातत्याने बिघाड होत आहे. दुसरीकडे वळती फीडरचा विस्तार सुमारे नव्वद किलोमीटरच्या आसपास असल्याने त्यावरून होणारा वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे. 

रेल्वेची परवानगी मिळविण्यात अपयश
कमी दाबाने पुरवठा व वारंवार बिघाड यातून मार्ग काढण्यासाठी महावितरणने चार वर्षांपूर्वी वळती फीडरचा काही भाग कोरेगाव मूळ उपकेंद्राशी जोडण्याचे नियोजन केले होते. मात्र पुणे-दौंड लोहमार्गाच्या खालून थेऊर फाटा व उरुळी कांचन येथे विद्युतवाहक तारा टाकाव्या लागणार आहेत. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळविण्यात महावितरण अपयशी ठरले आहे. त्याचा फटका पूर्व हवेलीतील शेतकरी आणि या परिसरातील उद्योगधंद्यांना बसत आहे. 

नवीन व जुन्या मुळा-मुठा कालव्यांतून गेल्या काही दिवसांपासून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. मात्र कमी दाबाच्या विजेमुळे पंप चालू होत नाहीत. वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने चालू झालाच तर वळती फीडरवरून तो खंडित होण्यास सुरवात होते. कालवे तुडुंब वाहत असतानाही, विजेअभावी पिके जळून जाण्याचा धोका वाढला आहे. याबाबत वीज कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनही आश्‍वासनाशिवाय काही मिळत नाही.
- संभाजी सर्जेराव महाडिक, शेतकरी, शिंदवणे, ता. हवेली 

Web Title: Power supply is extremely low pressure