भाजप-राष्ट्रवादी-मनसेत लढत रंगणार   

ज्ञानेश्‍वर बिजले
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन पक्षांत प्रभाग क्रमांक दहा (बावधन-कोथरूड डेपो) मधील लढत रंगणार असून, प्रभागातील काही गटांत शिवसेनाही चांगले आव्हान उभे करेल, असे सध्याचे चित्र आहे. या प्रभागात २१ उमेदवार रिंगणात आहेत.

भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन पक्षांत प्रभाग क्रमांक दहा (बावधन-कोथरूड डेपो) मधील लढत रंगणार असून, प्रभागातील काही गटांत शिवसेनाही चांगले आव्हान उभे करेल, असे सध्याचे चित्र आहे. या प्रभागात २१ उमेदवार रिंगणात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने उमेदवार निवडताना अन्य पक्षांतून आलेल्या काहींना प्राधान्य देत उमेदवारी दिली, तर मनसेचे तीन नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील सभागृहनेते शंकर केमसे आणि मनसेचे महापालिकेतील गटनेते किशोर शिंदे समोरासमोर लढत असून, भाजपचे किरण दगडे पाटील आणि शिवसेनेचे बबन भिलारेही याच गटात आहेत. प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या चौरंगी सामन्याकडे कोथरूड परिसराचे लक्ष लागलेले आहे.

भाजपमध्ये या प्रभागात अन्य पक्षांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले. त्यामुळे उमेदवार निवडताना नाराजी निर्माण झाली. पक्षाला मानणारा मतदार या भागात मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा फायदा होईल, असे भाजपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्‍वभूमी असलेल्या कुटुंबातील डॉ. श्रद्धा प्रभुणे हा नवा चेहरा भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरविला आहे. मनसेचे माजी नगरसेवक राजा गोरडे काही काळापूर्वी भाजपमध्ये गेले होते. त्यांना भाजपची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शेवटच्या टप्प्यात पक्षांतर केले. त्यांची पत्नी अंजली गोरडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. मनसेच्या नगरसेविका जयश्री मारणे यांच्यासमोर डॉ. प्रभुणे, गोरडे आणि शिवसेनेच्या आशा भिकुले यांनी आव्हान उभे केले आहे. या गटात चौरंगी लढत आहे.

‘क’ गटात मनसेच्या नगरसेविका पुष्पा कनोजिया, शिवसेनेचे माजी नगरसेवक अंकुश तिडके यांच्या पत्नी सुशीला, भाजपचे कार्यकर्ते गणेश वर्पे यांच्या पत्नी अल्पना, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार साधना विजय डाकले निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. या उमेदवारांचा व त्यांच्या पाठिराख्यांचा प्रभागातील काही भागांत प्रभाव असल्याने या गटातील निवडणूक रंगणार आहे.

सर्वसाधारण ‘ड’ गटात आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचे दिलीप वेडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कुणाल वेडे पाटील, शिवसेनेचे अविनाश दंडवते आणि मनसेचे प्रशांत कनोजिया यांच्यात मुख्य लढत होईल. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये या प्रभागातील चारही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीचे केमसे यांनी या परिसरात बरीच विकासकामे केली, तर मनसेच्या नगरसेवकांनीही केलेल्या विकासकामांचे अहवाल दिले आहेत. बावधन, परमहंसनगर, वेदभवन आणि लगतचा परिसर या प्रभागात येतो.

Web Title: prabhag 10 bjp-ncp-mns