तुल्यबळ उमेदवारांमुळे रंगत

योगिराज प्रभुणे
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

नात्यागोत्याचे राजकारण आणि नवीन मतदार अशी वडगाव धायरी-वडगाव बुद्रुक या प्रभागाचे वैशिष्ट्य आहे. अशा आव्हानात्मक मतदारसंघात तीन विद्यमान नगरसेवकांची या महापालिका निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

नात्यागोत्याचे राजकारण आणि नवीन मतदार अशी वडगाव धायरी-वडगाव बुद्रुक या प्रभागाचे वैशिष्ट्य आहे. अशा आव्हानात्मक मतदारसंघात तीन विद्यमान नगरसेवकांची या महापालिका निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसने चारही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. काँग्रेसला एकही जागा येथे मिळालेली नाही किंवा मैत्रीपूर्ण लढतही होत नाही. त्यात विद्यमान नगरसेवक विकास दांगट यांच्यासह अक्रुर कुदळे, सुनीता चव्हाण आणि स्वाती पोकळे यांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनीही या प्रभागातील सर्व जागांवर उमेदवार देऊन या प्रभागातील आव्हान कायम ठेवले आहे. मागील निवडणुकीत येथील मतदारांनी दोन्ही जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पसंती दिली होती. येथून युगंधरा चाकणकर आणि राजू लायगुडे विजयी झाले होते. आताच्या निवडणुकीत लायगुडे यांनी मनसेतून पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मनसे या प्रभागात तीन जागा लढवत आहेत. त्यात विद्यमान नगरसेविका युगंधरा चाकणकर यांच्याबरोबर चंदन कड आणि विजय साळुंके रिंगणात उतरले आहेत. भाजपने हरिदास चरवड, राजश्री नवले, नीता दांगट आणि लायगुडे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्या चिन्हावर अमोल दांगट, राधिका गिरमे, अनिता दांगट आणि महेश पोकळे निवडणूक लढवत आहेत. 

प्रमुख राजकीय पक्षांनी या प्रभागातून माळी आणि मराठा जातीच्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याचे दिसते. या प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्यांमध्ये नात्यागोत्याचे राजकारण आहे. यातील बहुतांश मतदार हे गावातील स्थानिक रहिवासी आहेत. त्यामुळे या प्रभागात प्रत्येक उमेदवाराचे निश्‍चित असे प्रभाव क्षेत्र आहे. त्याचा फायदा या उमेदवारांना होण्याची शक्‍यता अधिक आहे. 

वडगाव खुर्द, वडगाव बुद्रुक आणि धायरी असे या प्रभागाचे प्रमुख भाग आहेत. त्या प्रत्येक भागाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न पक्षांनी केलेला दिसतो. उमेदवारांच्या नात्यागोत्याच्या बरोबरीने नवीन मतदारांचा समावेश या प्रभागात झाला आहे. यातील बहुतांश मतदार हा सुशिक्षित आणि सोसायट्यांमध्ये राहणारा आहे. त्यामुळे त्यांच्या जवळचा उमेदवार देण्यासाठी पक्षनेतृत्वाने प्राधान्य दिल्याचे या तिकीटवाटपावरून दिसते. नात्यागोत्यामधील हक्काच्या मतदारांच्या पलीकडे जाऊन नवीन मतदारांचा कौल यात निर्णायक ठरणार आहे.

Web Title: prabhag33