तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरविण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

कॉंग्रेसला त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे, औंध- बोपोडीत थोपविण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सरसावले आहे. कॉंग्रेसचे दोन विद्यमान नगरसेवक याच भागातून लढण्यास इच्छुक असल्याने भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरविण्याच्या प्रयत्नात आहेत. कॉंग्रेसकडून नगरसेवक कैलास गायकवाड, नगरसेविका संगीता गायकवाड, त्यांचे पती माजी महापौर दत्तात्रेय गायकवाड यांच्यासह पक्षाचे दीड डझन कार्यकर्ते येथून इच्छुक असल्याने तिकिटावरून त्यांच्यात रस्सीखेच होण्याची शक्‍यता आहे.

कॉंग्रेसला त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे, औंध- बोपोडीत थोपविण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सरसावले आहे. कॉंग्रेसचे दोन विद्यमान नगरसेवक याच भागातून लढण्यास इच्छुक असल्याने भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरविण्याच्या प्रयत्नात आहेत. कॉंग्रेसकडून नगरसेवक कैलास गायकवाड, नगरसेविका संगीता गायकवाड, त्यांचे पती माजी महापौर दत्तात्रेय गायकवाड यांच्यासह पक्षाचे दीड डझन कार्यकर्ते येथून इच्छुक असल्याने तिकिटावरून त्यांच्यात रस्सीखेच होण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आणि आता भाजपमध्ये प्रवेश केलेले नगरसेवक प्रकाश ढोरे; तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी नगरसेवक श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य इच्छुकांच्या नावांची चर्चा आहे. 

नगरसेवक चंद्रशेखर ऊर्फ सनी निम्हण, संगीता गायकवाड (प्रभाग 8), कैलास गायकवाड, शशिकला गायकवाड (7) आणि ढोरे आणि अर्चना कांबळे (6) या नगरसेवकांच्या जुन्या प्रभागांमधील भाग जोडल्याने नव्यारचनेत औंध- बोपोडी हा प्रभाग (8) अस्तित्वात आला आहे. जुन्या प्रभागांमधील सहापैकी चार जागा कॉंग्रेस आणि दोन जागा मनसेकडे आहेत. औंध, बोपोडी गावठाणासह, सानेवाडी, आनंद पार्क, पंचवटी, अभिमानश्री सोसायटी, सिंध कॉलनी, चव्हाणनगरचा काही भाग आणि औंध रस्ता नव्या प्रभागात आहे. उच्चभ्रू सोसायट्यांसह झोपडपट्टयांचाही काही भाग या प्रभागात आहे. येथील एक जागा अनुसूचित जाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), दोन जागा खुल्या गटासाठी आहेत. महिलांसाठी आरक्षित जागेवर सक्षम उमेदवार शोधण्याचा सर्वच राजकीय पक्षांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. 

या आधी या प्रभागातून कॉंग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, दत्तात्रेय गायकवाड यांनी नेतृत्व केले आहे. या भागात कॉंग्रेसला मानणारा पारंपरिक मतदार असल्याने चारही जागा जिंकण्याच्या दृष्टीने कॉंग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सोसायट्यांचे परिसर याला जोडल्याने भाजपच्या आशा वाढल्या असून, ढोरे यांच्या प्रवेशानंतरही पक्षाकडून अन्य उमेदवारांची जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या 2007 च्या निवडणुकीत या भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही यश मिळाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीमध्येही इच्छुकांची संख्या वाढली आहे. या भागातील अस्तित्व कायम राखण्यासाठी मनसेनेही व्यूहरचना आखली आहे. जुन्या- नव्या शिवसैनिकांची मोट बांधून त्यांना रिंगणात उतरविण्याच्या दृष्टीने शिवसेना तयारी लागली आहे. येथील बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांना चारही जागांवर तगडे उमेदवार द्यावे लागणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काही पक्षांमधून नवी नावे चर्चेत येण्याची शक्‍यता आहे. 

प्रमुख इच्छुक उमेदवार 

- कॉंग्रेस : कैलास गायकवाड, संगीता गायकवाड, दत्तात्रेय गायकवाड, आनंद छाजेड, शैलेजा खेडेकर, अदिती गायकवाड, राजेंद्र भुतडा, जुबेर पीरजादे, सुरेखा बांगर, सुंदर ओव्हाळ, कमल गायकवाड, निर्मला भालेराव, नंदकुमार धिवार, ज्योती परदेशी, रमेश पवळे, कांता ढोणे, हर्षा कांबळे 

- राष्ट्रवादी कॉंग्रेस : श्रीकांत पाटील, अशोक मुरकुटे, बाळासाहेब रानवडे, पौर्णिमा रानवडे, उषा जाधव, शशिकला पाडाळे, रतन भंडारी, मालन कांबळे, पुष्पा जाधव, ज्योती पवार, अरुण पवार 

- भाजप : प्रकाश ढोरे, सुरेश शेवाळे, मधुकर मुसळे, सचिन गायकवाड, सचिन वाडेकर, गणेश कलापुरे, ऍड. विजय शेलार, अर्चना मुसळे, सुनीता परशुराम वाडेकर 

- शिवसेना : अमित मुरकुटे, प्राजक्ता गायकवाड, राहुल जुनवणे, रूपाली जुनवणे, वनमाला कांबळे, शारदा पुलावळे 

- मनसे : अर्चना कांबळे, नाना वाळके, सुहास निम्हण, बेबी निम्हण, मयूर बोलाडे, अनिल व्हटकर, मधुकर प्रभाकर, प्रीती केदारी, रुचिता बोलाडे 

- भारिप बहुजन महासंघ : ऍड. सायली जोगदंड

Web Title: prabhaug8-aundh-bopadi