esakal | इंदापूरची प्राची शेतकऱ्यांना देतेय आधुनिक आणि तांत्रिक शेती व्यवस्थापनाचे धडे
sakal

बोलून बातमी शोधा

Prachi_Kadam

ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव अभ्यासदौऱ्याअंतर्गत कृषी विद्यापीठ आणि महाविद्यालय यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांचे प्रबोधन करावयाचे असते.

इंदापूरची प्राची शेतकऱ्यांना देतेय आधुनिक आणि तांत्रिक शेती व्यवस्थापनाचे धडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बावडा (इंदापूर) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाची विद्यार्थीनी कृषिदूत प्राची नारायण कदम ही अभ्यासदौऱ्यामध्ये भगतवाडी (ता.इंदापूर) येथील शेतकऱ्यांना निंबोळी अर्क निर्मितीचे धडे देत आहे. निंबोळी अर्क निर्मितीची प्रक्रिया, त्याचा वापर कसा करावा आणि निंबोळी अर्काच्या फायद्यांबाबत तिने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, तसेच निंबोळी अर्क कसे तयार करावे, याबाबतचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिकांवरील कीड व्यवस्थापनात निंबोळी अर्काच्या वापराने मित्र किटकांचे आणि पर्यावरणाचे संवर्धन होते. रासायनिक कीटकनाशकांच्या सततच्या वापरामुळे पिकांवर हानिकारक परिणाम दिसून येतात. निंबोळी अर्क अत्यंत कमी खर्चात बनणारे आणि पर्यावरणपूरक असे आहे. वाळलेल्या निंबोळ्यांचे बारीक चूर्ण करून ते सूती कापडात बांधून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी ते पाणी अर्थात निंबोळी अर्क आपण फवारणीसाठी वापरू शकतो. अशा प्रकारे शून्य रूपये खर्चामध्ये (झीरो बजेट) आपल्याला कीड नियंत्रण करता येते, अशा प्रकारची माहिती प्राचीने शेतकऱ्यांना दिली.

ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव अभ्यासदौऱ्याअंतर्गत कृषी विद्यापीठ आणि महाविद्यालय यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांचे प्रबोधन करावयाचे असते. मात्र, यंदा कोरोना या जागतिक महामारीमुळे सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्याच गावामधील शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यास सांगितले आहे.

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

गेल्या दोन महिन्यांपासून प्राची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना शेतीविषयक प्रात्यक्षिके करून दाखवत आहेत. माती परिक्षणासाठी मातीचे नमुने गोळा करणे, एकात्मिक तण नियंत्रण, जीवामृत निर्मिती, चारा प्रक्रिया यांसारख्या विषयांसंबंधी तिने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. यामुळे घरच्या घरी अगदी कमी खर्चात शेतीचे व्यवस्थापन कसे करावे, याची माहितीही शेतकऱ्यांना मिळत आहे.

पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक आणि तांत्रिक शेती व्यवस्थापनाचेही धडे ती येथील स्थानिक शेतकऱ्यांना देत आहे. कोरोनाच्या या काळात वेगवेगळ्या मोबाईल अॅपच्या मदतीने शेतकरी घरबसल्या आपल्या शेतमालाची खरेदी-विक्री कसे करू शकतात, तसेच दररोजच्या हवामानाचा आढावा कसा घ्यावा, याबाबतची माहिती तिने मेघदूत, किसान अभिमान यांसारख्या मोबाईल अॅपद्वारे शेतकऱ्यांना दिली. 

या उपक्रमासाठी तिला राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. पी. एन. रसाळ, कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. बी. टी. कोलगणे, कार्यक्रमाधिकारी डॉ. एस. डी. वाळे, विस्तार विभाग प्रा. डॉ. के. व्ही. गुरव हे ऑनलाईन सूचना आणि सल्ला मार्गदर्शन करत असल्याची माहिती प्राचीने दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image