प्राइड होम सोसायटीला अनधिकृत नळजोड प्रकरणी साडेसहा हजारांचा दंड

रवींद्र जगधने
मंगळवार, 24 एप्रिल 2018

प्राइड होम सोसायटीत अर्धा इंचाचे पाणीपुरवठा नळजोड असताना, दुसरे एक इंचाचे अनधिकृत नळजोड सोसायटीने घेतले होते. साडेसहा हजारांचा दंड भरून हा नळजोड अधिकृतपणे पुन्हा जोडण्यात आला.

पिंपरी (पुणे) - काळेवाडी-तापकीरनगर येथील प्राइड होम सोसायटीचे एक वर्षापासूनचे अनधिकृत नळजोड महापालिका पाणीपुरवठा विभागाने तोडला होता. मात्र, साडेसहा हजारांचा दंड भरून हा नळजोड अधिकृतपणे पुन्हा जोडण्यात आला. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्राइड होम सोसायटीत अर्धा इंचाचे पाणीपुरवठा नळजोड असताना, दुसरे एक इंचाचे अनधिकृत नळजोड सोसायटीने घेतले होते. याबाबत महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर यांना समजल्यानंतर त्यांनी ही बाब पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. परंतु, एक महिन्यानंतर नळजोड तोडण्यात आला. असे तापकीर यांनी सांगितले. मात्र, पाणीपुरवठा विभागाने दंडाची रक्कम भरून घेत चार दिवसात सदर नळजोड अधिकृत केले. याबाबत शिवसेनेचे युवराज दाखले म्हणाले, "सोसायटीचे पाणीपुरवठा कनेक्‍शन सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून तोडण्यात आले होते. मात्र, शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.'' नगरसेविका तापकीर म्हणाल्या, "पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या संगनमताने संबंधित बांधकाम व्यावसायिकाने अनधिकृत कनेक्‍शन घेतले होते. तसेच ते एक वर्षभर सुरू होते. यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करायला हवी'' 

अनधिकृत नळजोड अधिकृत करण्याच्या योजनेमधून या सोसायटीचा नळजोड अधिकृत केला आहे. तसेच सोसायटीतील लोकसंख्या पाहता दीड ते दोन इंच कनेक्‍शन देणे अपेक्षित आहे. मात्र, पाणी पुरवठा कमी असल्याने ते शक्‍य नाही. मात्र, भविष्यात ते दिले जाईल. 
- रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका. 

Web Title: Prade Home Society punishes in unauthorized detention case