praful patel
praful patelsakal

Prafull Patel : पुण्याचे विमानतळ उभारू शकलो नसल्याची खंत

शिक्षण, कृषी, रोजगार, विज्ञान- तंत्रज्ञान आदी सर्व क्षेत्रांमध्ये पुणे शहराच्या क्षमता अफाट आहेत. परंतु पुणे शहरात आजही या क्षमतांना न्याय देऊ शकेल, असे सुसज्ज विमानतळ नाही.
Summary

शिक्षण, कृषी, रोजगार, विज्ञान- तंत्रज्ञान आदी सर्व क्षेत्रांमध्ये पुणे शहराच्या क्षमता अफाट आहेत. परंतु पुणे शहरात आजही या क्षमतांना न्याय देऊ शकेल, असे सुसज्ज विमानतळ नाही.

पुणे - शिक्षण, कृषी, रोजगार, विज्ञान- तंत्रज्ञान आदी सर्व क्षेत्रांमध्ये पुणे शहराच्या क्षमता अफाट आहेत. परंतु पुणे शहरात आजही या क्षमतांना न्याय देऊ शकेल, असे सुसज्ज विमानतळ नाही. मी केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री असतानासुद्धा पुणेकरांची विमानतळ उभारणीची गरज पूर्ण करू शकलो नाही, अशी खंत आजही माझ्या मनात कायम आहे. परंतु पुणेकरांनी विमानतळासाठी आवश्‍यक जमीन उपलब्ध करून न दिल्याने, हे विमानतळ उभारता आले नसल्याचे माजी केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी (ता.१) येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सांगितले. पुणेकरांनी पुढाकार घेऊन पुणे शहरात अद्ययावत विमानतळ अस्तित्वात येण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे दिला जाणारा ३३ वा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक आणि समाजसेवक नितीन देसाई यांना आज प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी पटेल बोलत होते. यावेळी प्रसिद्ध शास्त्रज्ञ व पुण्यभूषण फाउंडेशन निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, सिंबायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार आणि बांधकाम व्यावसायिक गजेंद्र पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रतापराव पवार म्हणाले, ‘नितीन देसाई आणि मी मित्र आहोत. त्यांनी पहिला उद्योग सुरू केला.तो वाढवला. त्यानंतर त्यांनी अनेक व्यवसाय सुरू केले. त्यात अगदी टेक्नॉलॉजीपासून फूड प्रोडक्शनपर्यंत विविध व्यवसायांचा समावेश आहे. देसाई यांनी जिथे जिथे हात घातला, त्यात ते यशस्वी ठरले. पण त्यांचे दोन खास वैशिष्ट्ये आहेत. त्यातील पहिले वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी कायम सामाजिक दृष्टिकोन कायम ठेवला आणि दुसरे म्हणजे अडचणीत असलेल्यांच्या मदतीला ते नेहमी धावून जातात. याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.'

प्रतापराव पवार पुढे म्हणाले, 'त्यांनी अनेक संस्थांना व रुग्णालयांना सढळ हाताने मदत केली. देसाई हे दूरदृष्टी लाभलेले उद्योजक असून त्यांच्या उद्योगाला लाभलेली सामाजिक किनार मला जास्त भावते. ग्रामीण भागात रोजगार क्षमता उपलब्ध करून देण्यात आणि मूलभूत गरजांची पूर्तता करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी सकाळ रिलिफ फंडालाही सढळ हाताने मदत केली. त्यांच्या या मदतीमुळे ग्रामीण भागातील अनेक गावांचा पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला.गावे समृध्द करण्यासाठी ते सामाजिक जाणीवेतून मदत करत असल्याने त्यांच्याविषयी मला आदर आहे.त्यामुळे मला त्यांचे कायम कौतुक वाटते.ते आणि आम्ही कौटुंबिक मित्र आहोत.’

या कार्यक्रमात सीमेवर कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या हवालदार मोहम्मद फय्याज आलम, लान्स नाईक जयेंद्र भेंडेरकर, लान्स नाईक एम.जे.चाको, लक्ष्मण साळुंखे, नयनसिंग थापा आणि शिपाई वलसालन नादर या वीर जवानांचा खास गौरव करण्यात आला. डॉ. माशेलकर, मुरलीधर मोहोळ यांचेही भाषण झाले. डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले.

अनेक घटनांनी जीवनमूल्य शिकवले - देसाई

मी आता वयाच्या ८० व्या वर्षात पदार्पण केले असून सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून सामाजिक कार्याचे व्रत मी स्वीकारले आहे. एच. व्ही. देसाई डोळ्यांचे रुग्णालय, दिशा, जनसेवा फाउंडेशन आदी संस्थांच्या माध्यमातून मी जे सामाजिक कार्य करीत आहे.ते कार्य करण्यात मला ज्यांचा हातभार लाभत आहे, त्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने मी आजचा हा पुण्यभूषण पुरस्कार स्वीकारत आहे. या सामाजिक कार्यकर्त्यांमुळेच मी माझे सामाजिक काम उभे करू शकत आहे, याची मला जाणीव आहे.

या कार्याच्या प्रवासात मी अशा अनेक घटनांचा साक्षीदार झालो. ज्या घटनांनी मला जीवनमूल्य शिकवले. दातृत्व केवळ श्रीमंतांकडेच असते, हा समज खोटा ठरवत गरिबांतील गरीब माणसाने माझ्या सामाजिक कामात दहा रुपयांचे का होईना योगदान दिलेले आहे. त्यामुळे आयुष्याच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना नेहमी असे म्हणावेसे वाटते की, माझ्यातील सर्व चांगल्या गोष्टी मला समाजाला द्यायच्या असून त्यातील कोणतीच गोष्ट माझ्याकडे शिल्लक राहू नये, अशा शब्‍दांत पुरस्कारार्थी नितीन देसाई यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com