पोलिसांच्या धैर्याचे बारामतीत कौतुक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

बारामती -मोर्चेकरी हजारो आणि पोलिस फक्त बोटावर मोजण्यापुरतेच. मात्र, अचानक दगडफेक सुरू झाल्यानंतर दोन्हीकडून होत असलेल्या दगडांच्या माऱ्यातही निश्‍चल व निर्भयपणे सामोरे जात रस्त्यावर उभ्या ठाकलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी आज बारामतीकरांना धैर्याचे दर्शन घडविले. 

बारामतीत मराठा मोर्चेकरी बंदसाठी फिरत असताना पोलिसांचीही गाडी त्यांच्या मागोमाग फिरत होती. पण, बस स्थानकासमोर दगडफेक सुरू झाली असे दिसतानाच पोलिसांनी प्रसंगावधान राखले. समोरून, वरून दगड येत आहेत, याची माहिती असतानाही बस स्थानकातील प्रवाशांना काहीही झाले नाही पाहिजे, यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून महिला पोलिस कर्मचारीही रस्त्यावर उतरल्या होत्या, हे आजच्या घटनेतील वैशिष्ट्य ठरले.

बस स्थानकासमोर आज दुपारी अचानक दगडफेक सुरू झाल्यानंतर मोर्चातील बंदोबस्तासाठी व बस स्थानकासमोर वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही पुरुष व महिला पोलिस कर्मचारी नियुक्त होते. अचानक सगळीकडे धावाधाव सुरू झाली. 

मात्र या कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या जागेवरूनच रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांना व इतरांनी सुरक्षितस्थळी नेण्यासाठी मदत केली. दगडांच्या माऱ्यातही सामान्यांची केलेली सुरक्षितता यामुळे महिला पोलिस आज बारामतीकरांच्या कौतुकाच्या धनी ठरल्या. अपुरी संख्या असूनही पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न मोर्चेकऱ्यांसह इतरही संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या कौतुकास पात्र ठरले.

Web Title: Praise of police bravery in Baramati