
Aurangzeb Controversy : "औरंगजेब या मातीतले नाहीत का? फोटो लावले म्हणून..." ; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य!
Aurangzeb Controversy : छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराविरोधात इम्तियाज जलील यांनी विविध पक्ष, संघटनांच्या सहकार्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली. यावेळी औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांनी अटक केली आहे.
या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेब या मातीतले नाहीत का? त्यांचा जन्म मोगल सल्तनत मध्येच झाला. फोटो लावले म्हणून मला काही नवीन वाटत नाही. ज्यांना हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये विभाजन घालायचे ते विरोधात बोलत असावेत. जात, धर्म राजकारण झालं की प्रादेशिक मुद्दे घेऊन राजकारण करतात, असा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करत एआयएमआयएमने औरंगजेबाचे फोटो झळकावले. औरंगाबाद कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू होते. यामध्ये कुठल्याही पक्षाचे बॅनर नाही मात्र औरंगजेबाचे झळकवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई देखील केली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि रावसाहेब दानवे यांनी कारवाईची मागणी केली होती.
काय म्हणाले होते खैरे -
यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, "याचा मी तिव्र निषेध करत आहे. हे सर्व नाटक आहे. छत्रपती संभाजी महाराजंच्या नावाला विरोध करणे चुकीचे आहे. इम्तियाज जलील यांचा जनाधार गेलेला आहे. त्यामुळे ते असे नाटक करत आहेत. मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. त्यामुळे हे षडयंत्र रचण्यात आले आहे. इम्तियाज जलील यांनी त्यांच्या पोराचे नाव औरंगजेब का नाही ठेवलं. एआयएमआयएमच्या सर्व नगरसेवकांनी त्यांच्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवावे. औरंगजेबाने मुस्लिम समाजाला सुद्धा त्रास दिला आहे. त्यांनी मंदिरे तोडले तरी एवढ प्रेम जलील यांना कसे वाटायला लागले?."