Modi Cabinet : भारताचं पर्यावरण आता प्रकाश जावडेकरांच्या हाती!

Prakash Javadekar
Prakash Javadekar

पुणे : प्रकाश जावडेकर यांच्या रुपाने पुणे शहराला केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा एकदा प्रतिनिधीत्त्व मिळाले आहे. मंत्रिमंडळातील प्रतिनिधीत्त्वाबाबत पुण्याचे सुदैव जावडेकरांच्या रुपाने कायम राहिले आहे. पर्यावरण, वन आणि प्रसारण ही महत्त्वाची समजली जाणारी खाते जावडेकरांना मिळाली आहेत. त्यामुळे देशाच्या पर्यावरणाची दिशा त्यांच्या हातात आली आहे. 

पुण्यातील नवी पेठ, पत्रकार नगरातून जावडेकर आता कोथरूडमध्ये मयूर कॉलनीत स्थिरसावर झाले आहेत. त्यांची पत्नी आणि मुलगे उच्चशिक्षित आहेत. पत्नी प्राची या शिक्षण संस्थांसाठी सल्लागार म्हणून काम करतात, तर थोरला मुलगा आशुतोष हा डेंटिस्ट आहे तर धाकटा मुलगा अपूर्व हैदराबादमध्ये एका शैक्षणिक संस्थेत प्राध्यापक आहे. जावडेकर मूळचे कोकणातील असले तरी, जावडेकरांचे शालेय शिक्षण येथील रमणबागेत झाले आहे. आई शिक्षिका होती तर, वडील पत्रकार. हिंदुत्त्वाचे बाळकडून त्यांना घरातूनच मिळाले. 

कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालया वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर काही काळ त्यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीही केली. शिक्षण घेत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये (अभाविप) ते सक्रिय होते. अभ्यासू वृत्ती, भाषण कौशल्य आणि संघटना बांधणीची हातोटी असल्यामुळे पक्षाने त्यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून संधी दिली आणि ते दोन वेळा आमदार झाले. त्यानंतर तिसऱ्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे काही काळ ते हिरमुसले होते. परंतु, प्रवक्ते म्हणून पक्षाने त्यांना सुरवातीला मुंबईत संधी दिली.

मिळालेल्या संधीचा फायदा घेत जावडेकर प्रवक्ते म्हणून ते दिल्लीत पोचले आणि केंद्रीय नेतृत्त्वाच्या मनात भरले. नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यावर त्यांनी जावडेकरांना सुरवातीला पर्यावरण खात्याचा स्वतंत्र कार्यभार दिला. त्यात चांगली कामगिरी केल्यामुळे अखेरच्या टप्प्यात केंद्रीय मनुष्यबळ विकास हे महत्त्वाचे खाते मिळाले. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांतील विधानसभा निवडणुकांदरम्यान संघटनात्मक जबाबदारी यशस्वीपणे पेलली. त्यामुळेच त्यांना पुन्हा मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. 

जावडेकर केंद्रात आता स्थिरावले असले तरी, पुण्यातील भाजपपासून ते अंतर राखून आहेत. महापालिका निवडणुकीत दोन-चार समर्थकांना उमेदवारी देण्यापुरताच त्यांनी हस्तक्षेप केला होता. तसेच पुणे- मुंबईत पक्षातंर्गत स्वतंत्र गट तयार करण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. मोदी आणि अमित शहांची मर्जी खप्पा होणार नाही, याची ते काळजी घेतात आणि त्यामुळेच त्यांचे स्थान बळकट राहिले आहे. पुण्यातून या पूर्वी मोहन धारिया, बॅरीस्टर विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. परंतु, पुण्यातून निवडून न येताही मागच्या दरवाजाने खासदार झालेल्या जावडेकरांनी मंत्रिमंडळात प्रवेश मिळविलाच ते अंगभूत कौशल्याच्याच जोरावर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com