इंदापूरमध्ये कृषिदूताकडून शेतकऱ्यांना चारा प्रक्रियेचे मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

पशुखाद्यामध्ये प्रक्रिया केलेल्या चाऱ्याच्या वापराचे चांगले फायदे दिसून येतात. चारा प्रक्रियेमुळे चाऱ्याचा रुचकरपणा वाढतो. प्रत्येकी २०० ग्रॅम गूळ, मीठ, युरीयाचे मिश्रण प्रति १० किलो चारा प्रक्रियेसाठी शेतकरी वापरू शकतात.

इंदापूर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय किणी, उस्मानाबाद येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थीनी प्रणाली दादासो माने हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कचरवाडी (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्यांना चारा प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून त्याचे फायदे पटवून दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पशुखाद्यामध्ये प्रक्रिया केलेल्या चाऱ्याच्या वापराचे चांगले फायदे दिसून येतात. चारा प्रक्रियेमुळे चाऱ्याचा रुचकरपणा वाढतो. प्रत्येकी २०० ग्रॅम गूळ, मीठ, युरीयाचे मिश्रण प्रति १० किलो चारा प्रक्रियेसाठी शेतकरी वापरू शकतात. चारा प्रक्रियेमुळे चाऱ्याच्या पोषक घटकांमध्ये वाढ होते. परिणामी, जनावरांच्या दूध उत्पादनात देखील वाढ होते. जनावरांची शारीरिक वाढ, प्रजनन क्षमता ही सुरळीत राखली जाते. अगदी कमी खर्चात आणि कमी वेळात जनावरांना पौष्टिक, सकस आहार उपलब्ध करून देता येतो. अशा प्रकारची माहिती कृषिदूत प्रणाली माने हिने शेतकऱ्यांना दिली.

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयामार्फत कृषिदूतांकडून अनेक प्रात्यक्षिक घेतली जात आहेत. मागील २ महिने हे कृषिदूत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना प्रात्यक्षिके दाखवत आहेत. याअंतर्गत जीवामृत निर्मिती, निंबोळी अर्क निर्मिती, माती परिक्षणासाठी माती नमुना गोळा करणे, एकात्मिक तण नियंत्रण यांविषयी कृषिदुतांकडून प्रात्यक्षिके घेतली जात आहेत.

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या उपक्रमांतर्गत कृषिदूत शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक आणि तांत्रिक शेती व्यवस्थापनाचेही धडे देत आहेत. वेगवेगळ्या मोबाईल अॅपच्या मदतीने शेतकरी घरबसल्या आपल्या शेतमालाची खरेदी-विक्री करू शकतात, दररोजच्या हवामानाचा आढावा घेऊ शकतात याबाबतचेही मार्गदर्शन कृषिदूतांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी मेघदूत, किसान अभिमान यांसारख्या मोबाईल अॅपची त्यांनी माहिती दिली.

यासाठी प्रणालीला कृषी महाविद्यालय उस्मानाबादचे प्राचार्य डॉ. राकेश अहिरे, कार्यक्रम समन्वय डॉ. किरण थोरात, कार्यक्रम अधिकारी डॉ. जयश्री तवले, विषयतज्ज्ञ डॉ. काकासाहेब चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pranali Mane explained benefits of fodder processing to farmers of Kacharwadi