कोरोनामुळे देशाचा उत्पादनातील कमकुवतपणा समजला : प्रताप चंद्र सारंगी

Pratap_Chandra_Sarangi
Pratap_Chandra_Sarangi

पुणे : दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या अनेक वस्तू आपण चीनसारख्या देशांमधून आयात करत आहोत. अनेक वस्तूंसाठी निर्यातीवर अवलंबून असलेले आपण उत्पादनात किती कमकुवत आहोत, हे कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत स्पष्ट जाणवते. आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे असेल तर सर्वच वस्तू आयात करून चालणार नाही, असे मत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) राज्यमंत्री प्रताप चंद्र सारंगी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. 

छोटे कारागीर, विणकर आणि हस्तकारागीरांना ई-व्यासपीठ मिळवून देणारा ‘फ्लिपकार्ट समर्थ’ उपक्रम फ्लिपकार्टकडून सुरू करण्यात आला आहे. त्याच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते.

'फ्लिपकार्ट' समूहाचे मुख्य कॉर्पोरेट अफेअर्स अधिकारी रजनीश कुमार, 'फ्लिपकार्ट'चे वरिष्ठ संचालक आणि मार्केटप्लेसचे प्रमुख जगजीत हारोडे यावेळी उपस्थित होते.

सारंगी म्हणाले, 'कोरोनाच्या सुरवातीला एकही पीपीई किट नसलेला आपला देश आता मोठ्या प्रमाणात हे किट निर्यात करत आहे. मात्र, केवळ मोठ्या प्रमाणात नाही तर जास्त लोकांनी उत्पादन करणे गरजेचे आहे. त्यातून नागरिकांची क्रयशक्ती वाढेल. कोरोनामुळे देशाचे अर्थचक्र हालले आहे. देशाचा गाडा पुन्हा रुळावर येण्यासाठी एमएसएमई महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या अनेकांना 'फ्लिपकार्ट समर्थ'ची मिळालेली मदत त्यांना प्रेरणा देणारे आहे. देशातील हस्तकला आणि कलाकुसरीच्या वारशाला ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून जागतिक केंद्र बनवण्याची हीच योग्य वेळ आहे."

हारोडे म्हणाले, "स्थानिक आणि एरवी दुर्लक्षित असलेल्या देशातील हस्तकला आणि हातमाग क्षेत्राला प्रकाशात आणण्याच्या ई-कॉमर्सच्या क्षमता 'फ्लिपकार्ट समर्थ'च्या एक वर्षाच्या या प्रवासातून समोर आल्या आहेत. सरकारी भागीदारींच्या साह्याने आम्ही आजवर ओडिशा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, पंजाब आणि कर्नाटकातील दुर्गम भागातील कारागीरांना ऑनलाईन आणू शकलो. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्हावा यावा यासाठी आम्ही अधिक संस्था आणि व्यक्तींपर्यंत पोहोचणार आहोत."

"मेक इन इंडिया'ला वरच्या पातळीवर नेण्यासाठी एमएसएमईच्या बहुक्षेत्रीय भूमिकेला नवे आयाम देण्यासाठी विविध प्रकारची भागीदारी महत्त्वाची भूमिका बजावतील. 'फ्लिपकार्ट समर्थ'सारखे उपक्रम खऱ्या अर्थाने लहानमोठ्या सर्व उद्योगांना यशस्वी होण्यासाठी सर्वसमावेशक परिसंस्था उभारत आहे. त्याचवेळी स्थानिक कारागीर आणि हातमागांसाठी समान परिस्थिती निर्माण करतात. यामुळे देशातील दुर्लक्षित घटकाने केलेल्या उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

- डॉ. नवनीत सेहगल, अतिरिक्त मुख्य सचिव, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, निर्यात संवर्धन, खादी आणि ग्रामोद्योग विभाग, उत्तर प्रदेश.

'फ्लिपकार्ट समर्थ'चा उद्देश

- देशभरातील सहा लाखांहून अधिक कारागीर, विणकर आणि हस्तकलाकारांना रोजगारासाठी सहाय्य
- या विक्रेत्यांना ई-कॉमर्सच्या व्यासपीठावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे 
- या समुदायांना खेळत्या भांडवलाची कमी, फारशा सुविधा नसणे आणि पुरेसे प्रशिक्षण नसणे अशा अडथळ्यांना सामोरे जावे लागते
- त्यांच्या या समस्या सोडवण्यासाठी या उपक्रमातून साह्य केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com