शिवप्रेमातून साकारली प्रतापगडाची प्रतिकृती (व्हिडिओ)

मयूर वाघ
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

पुणे - महाराष्ट्राचे खरे वैभव असलेले गडकिल्ले जनतेपर्यंत पोचविण्यासाठी धनंजय बर्वे या शिवप्रेमीने हिंजवडीतील माण रस्त्यावर प्रतापगडाची ५० फुटी प्रतिकृती ९ गुंठ्यांत साकारली आहे. आर्थिक स्थिती नसतानाही केवळ किल्ल्यांच्या प्रेमाखातर त्यांनी हा भव्य प्रकल्प उभारला आहे.

पुणे - महाराष्ट्राचे खरे वैभव असलेले गडकिल्ले जनतेपर्यंत पोचविण्यासाठी धनंजय बर्वे या शिवप्रेमीने हिंजवडीतील माण रस्त्यावर प्रतापगडाची ५० फुटी प्रतिकृती ९ गुंठ्यांत साकारली आहे. आर्थिक स्थिती नसतानाही केवळ किल्ल्यांच्या प्रेमाखातर त्यांनी हा भव्य प्रकल्प उभारला आहे.

हिंजवडीत भाड्याच्या घरात बर्वे राहतात. त्यांनी साकारलेली प्रतिकृती हुबेहूब प्रतापगडासारखी असून, गडाला तटबंदी, तोफा, भुयारी मार्ग, भुयारी मार्गातील देव-देवतांच्या प्रतिमा, गडाच्या मध्यभागी ग्रामदैवताची प्रतिमा आणि त्याशेजारी शिवलिंग ठेवण्यात आलेली आहे. गडाच्या शेजारी इतर गडांची माहिती देणारे फलक लावले आहेत. गडातून मार्गक्रमण करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांची माहिती छायाचित्रांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. 

सेंटरिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडी पाट्या वापरून किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यांनी व त्यांच्या कामगार मित्रांनी ही प्रतिकृती ३ महिन्यांत बनवलेली असून त्यांचा भाऊ, बहीण, आई व त्यांची पत्नी असे सर्व कुटुंबीय या कार्यात सहभागी आहेत. प्रतिकृतीला एकूण नऊ लाख रुपये खर्च आल्याचे बर्वे यांनी सांगितले. 

प्रतिकृतीचे काम पूर्ण झाले असून, फक्त महाराजांच्या धातूच्या मूर्तीमुळे उद्‌घाटन लांबणीवर पडले आहे. मूर्तीची किंमत दीड लाख रुपये सांगत आहेत, स्वराज्याच्या या कामासाठी एवढी रक्कम कुठून आणायची अशी खंत बर्वे यांनी व्यक्त केली. 

महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची स्थिती दयनीय आहे. इतर राज्यांमध्ये ऐतिहासिक वास्तूंचे जतन केले जाते, परंतु महाराष्ट्रात अनेक गडांवर दारूच्या बाटल्या, कचरा पडलेला असतो, गडांच्या भिंतीवर नावे लिहिलेली आढळतात. यामुळे झाकोळलेल्या गडकिल्ल्यांना उजाळा देण्यासाठी ही प्रतिकृती साकारली आहे.
- धनंजय बर्वे

धनंजय हे हरहुन्नरी कलाकार असून, महाराजांविषयी त्यांना अतीव प्रेम आहे. घरची परिस्थिती हलाखीची असली तरी त्यांची महाराजांसाठी काहीतरी करायची इच्छा होती. एक शिवप्रेमी म्हणून स्वराज्याच्या या कार्याला हातभार लागावा यासाठी माझी जमीन त्यांना दिली. 
- दिलीप भरणे 

Web Title: Pratapgad Copy Project Dhananjay Barve