शुभेच्छांच्या गुलाबांची विक्री करणे अयोग्य 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

पुणे - ""संमेलनाध्यक्षपदाच्या प्रचाराची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते; पण निवडून यावे म्हणून ज्यांनी शुभेच्छांचा गुलाब दिला त्या गुलाबांचीच नंतर विक्री करणे बरोबर नाही'', अशा शब्दांत कवी प्रवीण दवणे यांनी संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या प्रचारपद्धतीवर टिप्पणी केली. 

पुणे - ""संमेलनाध्यक्षपदाच्या प्रचाराची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते; पण निवडून यावे म्हणून ज्यांनी शुभेच्छांचा गुलाब दिला त्या गुलाबांचीच नंतर विक्री करणे बरोबर नाही'', अशा शब्दांत कवी प्रवीण दवणे यांनी संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या प्रचारपद्धतीवर टिप्पणी केली. 

साहित्य महामंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा डोंबिवली येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दवणे, काळे यांच्यासह जयप्रकाश घुमटकर, डॉ. मदन कुलकर्णी हे लेखक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रत्यक्ष गाठीभेटींबरोबरच "सोशल मीडिया'वर उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. काळे यांनी पाठिंबा दिलेल्या लेखक-कवी आणि प्राध्यापकांची भली मोठी यादी आपल्या "फेसबुक'वर पोस्ट केली आहे. या यादीवर दवणे यांनी टिप्पणी केली. शिवाय, आमच्यात "मैत्रिपूर्ण लढत' आहे, असेही सांगितले. त्यामुळे संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत रंगत आली आहे. 

दवणे म्हणाले, ""गेली 40 वर्षे निष्ठेने लेखन करतोय. पुस्तके, व्याख्याने, प्रत्यक्ष गाठीभेटी या माध्यमातून मी मतदारांपर्यंत पोचलेलो आहे. अनेक ठिकाणांहून मला पाठिंबा मिळत आहे. शुभेच्छा देणारे असंख्य लोक असल्यामुळे त्यांची यादी करता येणे अशक्‍य आहे. यादीपेक्षा ज्या निष्ठेने मी निवडणुकीत उतरलो आहे, ती मला अधिक महत्त्वाची वाटते. कोणालातरी हरवण्यासाठी ही निवडणूक नाही. आपल्याला आपली भूमिका एका मोठ्या व्यासपीठावर मांडता यावी, यासाठी आहे.'' 

यादी म्हणजे धूळफेक नाही 
""शंभरहून अधिक साहित्यिकांनी आणि दीडशेहून अधिक प्राध्यापकांनी मला पाठिंबा दिला आहे. त्यांना विचारूनच त्यांची नावे माझ्या कार्यकर्त्यांनी यादीत टाकली आहेत. ही नावे परस्पर किंवा धूळफेक करण्यासाठीही टाकली नाहीत. या नावांशिवायही अनेकांचा पाठिंबा मिळत आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांतील मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या आहेत. बडोदा, गुलबर्गा, भोपाळ, इंदूर, गोवा या भागांतील मतदारांचीही भेट झाली आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे'', असे अक्षयकुमार काळे यांनी सांगितले. 

Web Title: Praveen Davane commented on the promotion of methods of Akshay kumar kale